पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली असून आतापर्यंत तब्बल 1 लाख 13 हजार नागरिकांनी महापालिकेकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यांपैकी सुमारे तीस हजार अर्जांची छाननी झाली असून अद्याप छाननीचे काम सुरू आहे. लवकरच अर्ज आणि कागदपत्रांच्या छाननीचे काम पूर्ण केले जाणार असून अर्जात त्रुटी राहिलेल्या अर्जदारांना चुका सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतरच पात्र ठरणार्या अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
2022 पर्यंत घरे उपलब्ध करून देण्यासाठी योजना
देशभरात कोठेही मालकीहक्काचे घर नसलेल्या नागरिकांना 2022पर्यंत घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहर तसेच ग्रामीण भागातील गरीब आणि वंचित घटकातील जनतेला अल्प व्याजदराच्या कर्जावर परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या हद्दीत किती जमीनीची आणि घरांची गरज आहे, याची निश्चित आकडेवारी नोंदविण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले होते. त्यानुसार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली.
93 हजार नागरिकांनी केले होते अर्ज
याआधी पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 7 जूनपर्यंत निश्चित करण्यात आली होती. या मुदतीच्या काळात पालिकेकडे तब्बल 93 हजार नागरिकांनी घरासाठी अर्ज केले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत अनेक नागरिकांना अर्ज करण्यात अपयश आले होते, अर्ज भरताना तांत्रिक अडचणीही आल्या होत्या. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
तांत्रिक चुकांमुळे अर्जदार लाभापासून वंचित
पंतप्रधान आवास योजनेसाठी सोमवार अखेरपर्यंत तब्बल 1 लाख 13 हजार 228 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. यामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत 28 हजार 90, गृहकर्जावरील व्याजाच्या सवलतीसाठी 28 हजार 148, परवडणार्या घरांसाठी 41 हजार 783 आणि स्वतःच्या जागेवर घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मागणार्यांचे 15 हजार 207 अर्ज आले आहेत. यापैकी सुमारे तीस हजार नागरिकांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी झाली असून उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. ऑनलाईन अर्ज भरताना अर्जदारांनी काही तांत्रिक त्रुटी केल्याचे निदर्शनास येत आहे. अर्जाच्या रकान्यांमध्ये भरलेल्या माहितीतही काही विसंगती आढळून येत आहे. मात्र, या तांत्रिक चुकांमुळे अर्जदार योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी या त्रुटी दूर करण्यासाठी आणखी एक संधी अर्जदारांना दिली जाणार आहे. त्यानंतर अर्जाची छाननी पूर्ण केली जाणार असून पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.