प्रकल्पग्रस्तांच्या 7/12 उतार्यावर कोकण रेल्वेचे नाव; सुमारे 40 वर्षांपासून हक्काच्या नोकर्यांपासून नागरिक वंचित
पेण । सुमारे 40 वर्षांपासून हक्काच्या नोकर्यांपासून वंचित असलेल्या शेकडो कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी पेण येथील रेल्वेस्थानक परिसरात लाक्षणिक उपोषण केले. यावेळी समितीचे अध्यक्ष संदीप म्हात्रे सचिव प्रमोद पाटील विजय गायकवाड यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले होते. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नरेश गावंड, उपविभागीय प्रमुख जयराज तांडेल, दीपश्री पोटफोडे, विक्रम चालक मालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय पाटील, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरीश बेकावडे, बहुजन विद्यार्थी संघटनेचे पेण शहर अध्यक्ष समिर घायतळे, आरपीआयचे विनोद जोशी, कोकण प्रदेश बौद्ध महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर गायकवाड, मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, संदीप ठाकूर यांनी पाठिंबा जाहीर केला.
नोकरीसाठी प्रतीक्षा करावी लागल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी
वेळोवेळी रेल्वे मंत्री, जनरल मॅनेजर रेल्वे बोर्ड दिल्ली, मुख्य प्रबंधक मध्य रेल्वे डी. के. शर्मा-मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड, यांना निवेदन दिले आहे. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर उपोषण करावे लागले असल्याचे संदीप म्हात्रे यांनी सांगितले. मुख्य प्रबंधक मध्य रेल्वे डी के शर्मा-मुंबई यांची सकारात्मक भेट होऊन सुद्धा कोणतीही हालचाल होत नाही. 40 वर्षे नोकरीकरिता प्रतीक्षा करावी लागल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
रेल्वेच्या नावे भूसंपादन
तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी कोकण रेल्वेच्या नावे भूसंपादन केले. या नंतर आपटा ते रोहा हा रेल्वे प्रकल्प मध्य रेल्वेकडे वर्ग झाला. आजही प्रकल्पग्रस्तांच्या उतार्यावर कोकण रेल्वेचे नाव आहे. कोकण रेल्वे म्हणते आम्ही प्रकल्प मध्य रेल्वेला हस्तांतरित केला आहे व मध्य रेल्वेला प्रकल्पग्रस्तांबाबत माहितीच नाही त्यामुळे हे शेकडो प्रकल्पग्रस्त नोकरी पासून वंचित राहिले. तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडण्यात आले.