हक्कानी या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या जलालुद्दीन हक्कानीचे निधन

0

नवी दिल्ली-हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या जलालुद्दीन हक्कानीचा निधन झाले आहे. दीर्घ आजाराने जलालुद्दीन हक्कानीचा मृत्यू झाल्याचे तालिबानने म्हटले असून हक्कानीचा मृतदेह अफगाणिस्तानमध्ये दफन करण्यात आले आहे.

‘हक्कानी नेटवर्क’ ही संघटना तालिबानशी संलग्न आहे. २०१२ साली अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी हक्कानी नेटवर्कला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले होते. हक्कानी नेटवर्कला पूर्वी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे पाठबळ होते. सोव्हिएत संघाविरोधात अमेरिकेने हक्कानी नेटवर्कला मदत केली होती. मात्र, कालांतराने हाच गट पाश्चिमात्य देशांविरोधातही उभा राहिला.

पाकिस्तानने हक्कानी नेटवर्क ही संघटना अफगाणिस्तानमधून चालवली जाते, असा दावा केला आहे. मात्र, ही संघटना पाकिस्तानमध्येही सक्रीय असून तिथूनच दहशतवादी कारवायांचा कट रचला जातो, असा आरोप अफगाणिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांकडून केला जातो.

गेल्या १० वर्षांपासून जलालुद्दीन हक्कानी हा आजारी होता. त्याला अर्धांगवायूचा झटका आल्याचे सांगितले जात होते. सोमवारी हक्कानीचे दीर्घ आजाराने मृत्यू झाल्याचे तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी सांगितले.