हक्काने कर्तव्य बजावा! गारद्यांना गाडा!

0

निवडणुका होत राहतात. स्वत:ला चांगले म्हणवणारे लोक त्यापासून फटकून राहतत. आणि मग नको असलेलेच लोकांचे प्रतिनिधी म्हणून मिरवू लागतात. मतदान होते 40-45 टक्के. म्हणजे समाजातील निम्यांपेक्षा जास्त मतदान करतच नाहीत. आणि मग आपण गळा काढू लागतो. पण तोवर निवडणूक उरकलेली असल्याने त्या गळा काढण्याला काहीच अर्थ नसतो. तो फक्त मनाविरुद्ध काही घडल्याने केलेला थयथयाट ठरतो. आता तर सर्वोच्च न्यायालयानेही अशा निष्क्रिय बुद्धिमंतांना चांगलीच चपराक लगावली आहे. तुम्ही जर मत देण्याचे कर्तव्यच बजावत नसाल तर तुम्हाला सरकारला जाब विचारण्याचा तरी काय अधिकार? असा रोकडा सवाल न्यायालयाने विचारला आहे. तो योग्यच आहे!

यामुळेच आता आळस झटकून निष्क्रियता टाळत आपल्याला सक्रीय व्हावेच लागेल. यावेळची निवडणूक आहेही तशी महत्वाची.

यावेळी युती-आघाडी काही नाही. जो काही आहे तसाच मैदानात उतरलेला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचा बहुतेक प्रभागांमध्ये कोणी ना कोणी उभा आहे. त्यामुळे आता उगाचच हा पक्ष आवडतो पण त्याचा उमेदवारच आमच्याकडे उभा नाही असे कारण देण्यासही वाव नाही. तसेच एक नसेल तर दुसरा असे अनेक पर्याय आपल्यासमोर आहे. कोणी काही म्हणो मात्र राजकारण्यांनी सत्ता स्पर्धेपोटी का होईना मात्र एकमेकांविषयी आपले एवढे प्रबोधन केले आहे की मला माहित नव्हते त्यामुळे मी चुकीच्या माणसाला कसे मत देणार? मला माहितीच नव्हते. त्यामुळे मतच नाही दिले. तशा फोकनाड बचावाचीही आता संधी नाही. एवढेच नव्हे तर कोणीच आवडत नसेल तर चक्क उपलब्धांपैकी कोणालाही नाही म्हणजे अर्थातच ‘नोटा’चा पर्याय निवडण्याचीही सोय आहे.

त्यामुळे सर्वच नालायक वाटले. माझे मी मत द्यावे या लायकीचा त्यापैकी एकही नाही. असेही जर वाटले तरीही आता हरकत नाही. अशा मतदारांसाठी नोटाचा पर्याय आहेच! हे सारे झाले मतदानाचा हक्क आणि कर्तव्य बजवलेच पाहिजे यासाठी. मात्र प्रत्यक्षात निवडताना काय लक्षात ठेवावे हाही एक वेगळा विषय. ज्या उमेदवाराला निवडायचे त्याची संपूर्ण पडताळणी केलेली पाहिजे. माहिती असलीच पाहिजे. सध्या पारंपरिक निवडणूक साहित्याच्या जोडीला चालणाऱ्या ई-प्रचारामुळे आपले काम सोपे झाले आहे. समाजमाध्यमांमध्ये आवडो न आवडो उमेदवारांची कुंडली तयार आहे. गरज फक्त पडताळणीची असते. ती झाली की आपलं कामं सोपे असते. सर्व साधक-बाधक विचार करुन मगच मतदान यंत्रांचे बटन दाबायचे. मुंबईबाहेर तर पॅनल आहेत. तेथे एकदा नाही तर किमान तीन-चारवेळा मत द्यावे लागणार आहे. त्यांनी एका प्रभागातील उमेदवार आवडत नाहीत म्हणून मतदान टाळले. तर त्यांचे संपूर्ण प्रभागातच मत नोंदवले जाणार नाही. त्यामुळे त्यांनाही आपले कर्तव्य आणि हक्क 100% बजावावे लागणार आहेत.

मुंबईकर, ठाणेकर, उल्हासनगरकर, पिपंरी-चिंचवडकर, पुणेकर तुम्ही कुणीही असा आज मतदानासाठी जाताना फक्त काही क्षण थांबा आणि आठवा “तुमच्यासाठी कुणी काय केले आहे” ज्यांनी तुमच्यासाठी काही केले असेल त्यांना नक्की साथ द्या. पण पाच वर्षे काहीच न करता ऐनवेळी केवळ प्रलोभने दाखवून कुणी मत मिळवू पाहत असेल तर हटकून अशांना धडा शिकवा. मग तो कुणीही असो.

रामायण असो महाभारत असो अथवा बायबल, कुराण. एक वचन सर्वत्र आढळते. शब्द वेगळे असतात. पण संदेश तोच. “जे स्वत:ची मदत करत नाहीत त्यांची मदत ईश्वरही करत नाही” आज हेच लक्षात ठेवा! मत द्याच हीच संधी आहे तुम्हाला तुमच्या मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पिपंरी-चिंचवड, पुणे शहराचा घात करणारे किंवा भविष्यात घात करु शकणारे गारदी कोण ते ठाऊक आहे. अशा गारद्यांना गाडाच! हक्कानं कर्तव्य बजावा!!