हक्कासाठी जिल्हा विधी सेवातर्फे आजपासून न्यायालय आपल्या दारी

0

जळगाव । समाजातील काही लोकांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती नसते. त्यामुळे अशा लोकांना त्यांच्या हक्कांविषयी जाणीव करून देणे व त्यांच्या समस्येविषयी त्यांना विधी सेवेच्या माध्यमातून मदत मिळवून देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फिरती लोकअदालत जळगाव जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या दारी जाऊन सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. 9 ते 24 नोव्हेंबरदरम्यान असे 16 दिवस ही फिरती अदालत जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये विविध भागात जनजागृती करणार आहे. तसेच खटले देखील निकाली काढणार आहे. या फिरत्या न्यायरथाची सुरूवात आज 9 नाव्हेंबरपासून चाळीसगाव येथे उद्घाटन करून करण्यात करणार आहे.

अशी आहे फिरती अदालत
या वाहनात न्यायिक अधिकारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते, अशासकीय संस्था, विधी शाखेचे विद्यार्थी आणि विधी शिक्षक अशी तज्ज्ञ मंडळी असतील. गाडीत खुर्च्या, माइक, टेबल, संगणक, प्रिंटर, लघुलेखक, अधिकार्‍यांना बसण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था, फाइल ठेवण्याकरिता कपाट तसेच कोट रुममध्ये प्रोजेक्टर, लोकांशी संवाद साधण्याकरिता आत व बाहेर व्यवस्था राहणार आहे. लोकन्यायालयाचा रथ विविध गावांमध्ये फिरून,आपआपसातील वाद असलेली दाखलपूर्व प्रकरणे व संबंधित न्यायालयामध्ये दाखल असलेली तडजोड पात्र प्रकरणे, त्याच गावामध्येच निकाली काढण्यात येणार आहेत.

प्रलंबित असलेल्या समस्या सोडविल्या जाणार
अनेकदा संकुचित वृत्तीने लोक जिल्हा किंवा तालुकास्तरावरील विधी सेवा केंद्रापर्यंत समस्या सोडविण्यास जात नाहीत. त्यामुळे ही फिरती लोकअदालत अनुभवी न्यायिक अधिकारी, वकील, कायद्याचे शिक्षक, सामाजिक कार्यकर्त्यांसह खेड्यातील छोट्यात छोट्या गावात, आदिवासी भागात, औद्यागिक वसाहती याठिकाणी जाऊन महिला, कामगार वर्ग आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना कायद्याविषयी माहिती देण्यात येईल. तसेच लोकअदालतीच्या माध्यमातून जागृती निर्माण करून सहजपणे आणि तत्परतेने त्यांच्या समस्या सोडवतील. जास्तीतजास्त संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असे फिरणार न्यायरथ
9 ते 10 नोव्हेंबर चाळीसगाव, 11 नोव्हेंबर-भडगाव, 12 नोव्हेंबर-पाचोरा, 13 नोव्हेंबर-जामनेर, 14 नाव्हेंबर-मुक्ताईनगर, 15 व 16 नोव्हेंबर-भुसावळ, 17 नोव्हेंबर-रावेर, 18 नोव्हेंबर-यावल, 19 नाव्हेंबर-चोपडा, 20 नोव्हेंबर-धरणगाव, 21 नोव्हेंबर-एरंडोल, 22 नोव्हेंबर-पारोळा, 23 व 24 नोव्हेंबर-अमळनेरला न्यायरथ फिरणार आहे. तसेच या ठिकाणी जावून जनजागृती व समस्या सोडविण्यात येणार आहे.