जळगाव । शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपुर्ण राज्य हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी विविध उपाययोजनाही राबवितांना दिसत आहे. मागील दोन वर्षापासून हगणदारीमुक्तीसाठी प्रयत्न केले जात असून अद्यापही हगणदारीमुक्ती झालेली नाही. शासनातर्फे हगणदारीमुक्त करण्यासाठी सर्व प्रकारची सेवा सुविधा, मनुष्यबळ पुरविण्याचे काम केले जात आहे. अद्याप पर्यत जळगाव जिल्हा हगणदारीमुक्त होऊ शकलेला नाही. आकडेवारी पाहता जिल्हा केवळ 50 टक्के हगणदारीमुक्त झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील डोगराळ भाग हगणदारी मुक्त झाला असून जळगाव नाही ही फार मोठी शोकांतीका असुन हगणदारीमुक्त करण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवून कार्य करा अशी तंबी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रधान सचिव राजेशकुमार मिना यांनी जिल्हा परिषदेतील आढावा बैठकीत अधिकारी कर्मचारी यांना दिली.
..तर 2023 उजाडेल
हगणदारीमुक्त करण्यासाठी सर्व उपाययोजना शासन करीत आहे. विविध प्रकारचे अनुदान देखील शासन उपलब्ध करुन देत आहे. मात्र याची योग्य अंमलबजावणी होत नसुन जनतेपर्यत ही माहिती पोहचत नाही. 31 मार्च 2018 पर्यत संपुर्ण राज्य हगणदारीमुक्त करण्याचा मानस शासनाचा असुन राज्यातील 23 जिल्हे हगणदारीमुक्त झाले आहे. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील हगणदारीची स्थिती चिंताजनक असून या संथगतीने जर काम सुरु राहिले तर जिल्हा हगणदारीमुक्त होण्यास 2023 उजाडेल अशी परिस्थिती असल्याचे प्रधानसचिव यांनी नमुद केले.
मंत्री महाजनांचा तालुका पिछाडीवर
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेला जामनेर तालुका अद्यापही शंभर टक्के हगणदारीमुक्त होऊ शकलेला नाही. तालुका जेमतेम 50 टक्के हगणदारीमुक्त झाल्याची आकडेवारी आहे. जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतकेच तालुके हगणदारीमुक्त झाले आहे. 31 मार्च पर्यत संपुर्ण जिल्हा हगणदारीमुक्त झाला पाहिजे. हगणदारीमुक्त होणार्या गावांना शासनातर्फे बक्षिसे जाहीर करण्यात आले आहे. 11 महिन्यानंतर जिल्हा हगणदारीमुक्त झाला पाहिजे झेडपी कर्मचार्यांनी प्रत्येक गावातील हगणदारीची परिस्थितीची पहाणी करावी. मी पुन्हा दोन आठवड्यानंतर आढावा घेईल तेव्हा ही परिस्थिती दिसायला नको अशी तंबी प्रधान सचिवांनी दिली.
सीईओंना बढती नाही
हगणदारीमुक्त करण्यासाठी सर्व उपाययोजना सुरु असुन शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हगणदारीमुक्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत स्वच्छता हा विभाग येत असल्याने मुख्यमंत्री यांनी जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याशिवाय मुख्यकार्यकारी अधिकारी यांना बढती मिळणार नसल्याचे निर्देश दिले आहे. सीईओ अस्तिककुमार पांण्डेय यांना जळगाव जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याशिवाय जिल्हाधिकारी म्हणून बढती मिळणार नाही असे यावेळी सांगण्यात आले. सीईओंची जळगाव जिल्ह्यातील सेवेला तिन वर्ष पूर्ण झाले असून त्यांना महिनाभरानंतर त्यांची बदली अथवा बढती मिळणार आहे.