शहादा । शहरात हगणदरीमुक्त शहर पाहणीसाठी केंद्रशासनाची केंद्रीय समिती नगरपालिकेत येत्या दहा ते बारा दिवसात येणार आहे. शहरातील विविध भागात भेटी देवुन पहाणी करणार आहेत अशी माहिती मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी दिली.शासनाने गेल्या दोन वर्षापासुन स्वछता मिशन सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन गाव अथवा शहर हगणदरीमुक्त मोहीम राबविली जात आहे.
शहादा नगरपालिकेने गेल्या एका वर्षापासुन शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. जनजागृती केली. नगरपालीका प्रशासन नागरीकापर्यंत पोहचले.गल्ली बोळात फिरुन नागरिकाना उघड्यावर शौचास जाऊ नये असे सातत्याने आवाहन केले.शासनाच्या निधीतुन शेकडो शौचालय अनुदानातुन बांधले शिवाय सार्वजनीक सुलभ शौचालये बांधलीत त्याचे फलीत शहादा शहर 100% हगणदरीमुक्त झाल्याचा दावा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी करुन शहादा नगरपालिका जिल्हा व राज्यपातळीवर यशस्वी झाली असुन केंद्रशासनाच्या पातळीपर्यंत पोहचली आहे. हा पालिकेचा बहुमान असल्याचे सांगितले यात शहरातील नागरिकांचे सहकार्य मिळाले.
केंद्रीय पातळीवर मुल्यांकन
येत्या 10 ते 12 दिवसात केंद्र शासनाची समिती पाहणी करण्यासाठी येणार आहे. शहरातील काही भागांना समिती सदस्य भेट देतील व पहाणी करतील. तत्कालीन नगराध्यक्ष बागुल यांच्या कार्यकाळात संत गाडगे महाराज नागरी स्वछता अभियानात न.पा. जिल्ह्यात व नासिक विभागात प्रथम क्रमांक मिळाला होता. आता विद्यमान नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या काळात केंद्रीय पातळीवर बक्षीस मिळते की काय याकडे लक्ष लागले आहे.