हचिंग शाळेने केली अवाजवी फी वाढी

0

पालकांनी दर्शविला विरोध

तळेगाव दाभाडे : येथील हचिंग इंटरनॅशनल शाळेच्या मनमानी कारभार आणि अवाजवी फी वाढीला विरोध दर्शवत पालकांनी एकत्र येऊन फीच्या पावत्या भिरकावत मुख्याध्यापिकेला जाब विचारला. गतवर्षीच्या तुलनेत शाळेने कुठलीही पूर्वसूचना न देता अवांतर कार्यक्रमांच्या नावाखाली जवळपास 40% ते 50% फ़ी वाढ लादली आहे. टयुशन फीमध्येही 10 टक्के वाढ केली आहे. शाळेतील विविध वर्ग सुटण्याच्या वेळेत बराच फरक असून मुले, पालक आणि बसचालकांना जवळपास एक तास ताटकळत उभे रहावे लागते. याबरोबरच वाढीव दराची वह्या, पुस्तके आणि शालेय साहित्य शाळेने नेमलेल्या एजन्सी मार्फतच विकत घेण्यासाठी सक्ती केली जात आहे. कराटे वर्गासाठी दोन वर्षे अगोदर पैसे घेऊनही अद्याप गणवेष वाटप आणि वर्ग सुरु करण्यात आले नाहीत.

सायन्स लॅब अदयाप सुरु नाही
न पेलावणारे दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांना वहावे लागते. सायन्स लॅब अदयाप सुरु करण्यात आलेली नाही. अवाजवी फीवाढ रद्द करुन, शाळेची सुटण्याची वेळ बदलून एकच सोयीची वेळ ठेवावी अशी पालकांची मागणी आहे. शाळा व्यवस्थापन पालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेत. विकसन फी वसूल करुन त्या बदल्यात सुविधा मात्र पुरवत नसल्याचा पालकांचा आरोप आहे. शाळेच्या या अन्यायाविरुध येत्या दोन-तीन दिवसांत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटुन निवेदन देणार असल्याचा इशारा पालकांनी दिला. नगरपरिषद शिक्षण मंडळ तसेच गटशिक्षणाधिकारी खाजगी शाळांच्या मनमानीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचे शोषण चालू असल्याचा आरोपही काही पालकांनी यावेळी केला.

बैठकीचे आश्‍वासन
शिक्षक-पालक समितीची पारदर्शकता ठेऊन मतदानाद्वारे निवड करण्याची पालकांची मागणी आहे. खाजगी शाळांचे शैक्षणिक बाजारीकरण थांबवण्यासाठी पालकांच्या मागण्यांना माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी आपला पाठींबा दिला. मुख्याध्यापिका शोभा कार्नलिऊस यांनी तीन आठवडयांच्या आत पालकांची शाळा व्यवस्थापनाबरोबर बैठक आयोजित करणार असल्याचे आश्‍वासन दिले.