हडपसरमध्ये नागरिकांचा ‘आधार’ हरपला

0

सहायक आयुक्त कार्यालयातील आधार केंद्र बंद

हडपसर । केंद्र सरकारने आधार कार्ड देशवासियांना बंधनकारक केलेले आहे. सर्व व्यवहार आधारशी जोडण्याचे काम सुरू आहे. अगदी रेल्वे बुकिंगपासून गॅस सिलेंडरपर्यंत आणि बँक खात्यापासून अगदी इनकम टॅक्सपर्यंत ‘आधार’ गरजेचे आहे. मात्र हडपसर सहायक आयुक्त कार्यालयातील आधार केंद्र बंद असल्याने यासाठी नोंदणी करण्यार्‍या ग्राहकांचा जणू ‘आधार’च हरपला आहे.

सर्वसामान्य नागरिकांनाही आता याची गरज भासत असून छोट्यापासून मोठ्या गोष्टींपर्यंत अधिकृत कागदपत्र म्हणून आधारचा आधार घेणे आवश्यक झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच कोणतीही सूचना व पर्यायी व्यवस्था करता हडपसर येथील आधार केंद्र बंद केले आहे. बँक, शाळा, परीक्षा, विविध दाखले, पेन्शन यासाठी व सर्व ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. हे केंद्र अचानक बंद झाल्यामुळे हडपसर येथील नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे अडचण
आधार कार्ड केंद्र बंद झाले असताना अन्य कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. याबाबत महापालिका प्रशासकीय अधिकारी यांना विचारले असता आम्हाला माहीत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अधिकारी किती गांभीर्याने या योजनेकडे पाहत असल्याचे दिसून येत आहे. लवकरात लवकर आधार कार्ड नोंदणी केंद्र लवकर सुरू करावे. यासंदर्भात हडपसर सहायक आयुक्त संध्या घागरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नसल्याने प्रतिक्रिया मिळाली नाही.

पालिका अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
केंद्र सरकार मोठ्या लाखो रुपयांच्या जाहिराती खर्च करून आधार कार्ड काढावे यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु प्रत्यक्षात आधार केंद्र बंद असल्याने पालिकेच्या अधिकार्‍यांनी केंद्राच्या योजनेला हरताळ फासला आहे. हडपसर सहायक आयुक्त कार्यालयातील आधार केंद्र बंद असल्याने सर्व सामान्य जनतेने आधार कार्ड नोंदणीसाठी काय करायचे? असा प्रश्‍न पडला आहे.