हडपसरमध्ये पाच दुकानांना आग

0

पुणे । हडपसर येथील बिटी कवडे रोड परिसरातील चार ते पाच दुकानांना मंगळवारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. जवानांनी येथील एका दुकानातून दोन सिलेंडर बाहेर काढले असून आगीत कोणीही जखमी झाले नाही.

अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.टी. कवडे रोडवर असलेल्या लजिज बिर्याणी हाउस, किरण गादी कारखाना, सगुना चिकन सेंटर आणि एका भाजी विक्रेत्याच्या स्टॉलला ही आग लागली होती. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. दुकानातील कामगार वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.