हडपसरमध्ये पालख्यांना भावपूर्ण निरोप

0

हडपसर। संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरी माउलींची पालखी भवानी पेठेतून, तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी दोन दिवस शहरवासीयांचा पाहुणचार घेऊन हडपसरकडे प्रस्थान ठेवले. पुलगेटपासून हडपसरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा चहा आणि फराळाचा आस्वाद घेत ‘माऊली माऊली’चा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोनेरी किरणांचा वर्षाव आणि वरुणराजाचे तुषार अंगावर झेलत विठ्ठलाचे भजन गाजत पालख्या मार्गस्थ झाल्या.

पहिला विसावा हडपसर गाडीतळ ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचे 9 वाजून 45 मिनिटांनी आगमन झाले. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पादुकांची पूजा झाल्यानंतर भाविकांनी दर्शन घेतले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते चेतन तुपे, हेमलता मगर, नगरसेवक नाना भानगिरे, उज्ज्वला जंगले, मारुती तुपे, माजी महापौर वैशाली बनकर, सागर भोसले, संदीप शेंडगे, सुभाष जंगले, अमोल हरपळे, विजय देशमुख उपस्थित होते.

सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील पोलीस निरीक्षक सुनील तांबे, अंजुमन बागवान, विश्‍वजित खुळे, वाहतूकचे पोलीस निरीक्षक जग्गनाथ कळसकर आणि महापालिकेचे अधिकारी यांनी पालखीच्या दर्शनासाठी विशेष नियोजन केले होते. स्मार्थ थिकिंग करिअर अ‍ॅकॅडमी आणि ससाणेनगर येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचारीही बंदोबस्तासाठी सहभागी झाले होते.

सकाळपासूनच परिसरातील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत दर्शन घेतले आणि वरुणराजा बरसू दे असे साकडे घातले. वाढती महागाई आणि काहीसे दुष्काळाचे सावट यामुळे संस्था आणि मंडळाचे कार्यकर्तेही फराळ वाटपात कमी पडले होते. मोजक्याच तरुणांनी एकत्र येऊन एकादशीनिमित्त वैष्णवभक्तांना फराळ आणि गरमागरम चहाचे वाटप केले. बैठ्या चाळी आणि सहकारी सोसायटीमध्ये दिंडीतील वारकर्‍यांना भोजनाची व्यवस्था केली होती. ज्ञानेश्‍वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भक्तांनी दर्शन घेतले.

मोफत औषध वाटप
हडपसरमधे विविध सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांकडून वारकर्‍यांना विविध पदार्थ वाटप करण्यात आले. शेवाळवाडी येथे विशाल ढोरे, राहुल शेवाळे, सरपंच अशोक शिंदे यांनी स्वागत करून फराळ व्यवस्था केली होती. उरुळी देवाची येथे डॉ.स्वप्नील भाडळे व मित्र परिवाराकडून वारकर्‍यांना मोफत औषध वाटप केली. शहीद भगतसिंग ट्रस्टच्या वतीने गाडीतळ येथे नोबल रुग्णालयाच्या वतीने वारकर्‍यांसाठी आरोग्य तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आली. डॉ.दिलीप माने, डॉ. मंगेश लिंगायत, गोपीनाथ पवार, बच्चूसिंग टाक यांनी संयोजन केले होते.

सावित्रीबाई फुले महिला विकास प्रतिष्ठानच्या वतीने शेवाळवाडी येथे वारकर्‍यांना पुस्तके वाटप रामचंद्र कुंभार व सारिका कुंभार यांनी केले. हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने अवयवदान जनजागृती व मुलगी वाचवा अभियान रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, वैशाली बनकर सहभागी झाले होते. डॉ. शंतनु जगदाळे, डॉ. सचिन आबणे, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. मंगेश वाघ, डॉ. गणेश राख, डॉ. सुहास लांडे, डॉ. लाला गायकवाड, डॉ सुनिता घुले, डॉ वंदना आबणे सहभागी झाले होते.

वैष्णवभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण
गाडीतळ येथे तुकोबारायांच्या पालखीचे बाराच्या सुमारास पहिल्या विसाव्यासाठी पोहचली. महापौर, नगरसेवक, माजी नगरसेवकांच्या उपस्थिती पादुकांची पूजा करण्यात आली.
होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे भजन करत वारकरी पंढरीकडे निघाला आहे. सोनेरी किरणांमध्ये न्हाऊन निघालेला वारकरी वरुणराजाकडे डोळे लावून पंढरीकडे पाऊले टाकत होता. वरुणराजाने दोन दिवस हजेरी लावल्यानंतर सुटी घेतल्यामुळे वैष्णवभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, वारीतील उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.

लाखो वैष्णवभक्तांनी घेतले दर्शन
विठ्ठल नामाची शाळा भरली । शाळा शिकताना तहानभूक हरली ॥
असा गजर करीत हडपसर-गाडीतळ येथे संत ज्ञानेश्‍वर माऊली आणि जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांचे लाखो वैष्णवभक्तांनी शांततेत भक्तीभावाने दर्शन घेतले. हडपसरनगरी वैष्णवभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. वाफळता चहा, दूध, कॉफी, गरमागरम खिचडी, केळी असा फराळ घेत वारकरी हडपसरमध्ये विसावला होता. हडपसरच्या पंचक्रोशीमधील लाखो भाविक ज्ञानेश्‍वर माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी धाव घेत होते. लहानग्यांना खांद्यावर घेत दर्शनासाठी धडपड करीत होते.

नियोजनबद्ध पोलीस बंदोबस्त
हडपसर येथे ज्ञानेश्‍वर माऊली, व तुकाराम महाराज यांच्या पालख्या येतात येथून पुन्हा दोन महामार्गांने वेगळ्या होतात वानवडीचे सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील, हडपसर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी गेले आठवडा भर पालखी नियोजन केले होते पालखी रॅम्प साठी पालिकेने निधी न दिल्याने हडपसर च्या नगरसेवकांनी स्वखर्चातून मंडप बांधला होता, पोलिसांनी अतिशय सुरेख नियोजन केल्याने सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ झाला. किरकोळ चोरी वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.