हडपसर । पीएमआरडीएच्या वतीने नवीन तीन मेट्रो मार्ग सुरू करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या नवीन मेट्रोमार्गांमध्ये हडपसर येथे मेट्रो मार्ग तयार केल्यास वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. याबाबत आमदार योगेश टिळेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिेले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील मेट्रोचा तिसरा टप्पा शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट ते हडपसर- शेवाळेवाडी हा मेट्रो मार्ग सुरू करावा, याबाबतची मागणी मी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये पुण्याकडून जाणारा एकमेव पुणे-सोलापूर महामार्ग आहे. या मतदार संघात मगरपट्टा सिटीमध्ये आयटीमध्ये काम करणार्या युवकांची संख्या अधिक आहे. रामटेकडी व हडपसर औद्योगिक वसाहतीत कामगरांची संख्या अधिक आहे. पुणे-सोलापूर रोड हा अपुरा पडत असल्याने या रस्त्यावर वांरवार वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे सर्वच नागरिकांची कुंचबणा होते. या वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी मेट्रो मार्गाची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्याना पटवून दिल्याचे तसेच त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे टिळेकर म्हणाले.
मेट्रो वगळताना झोपले होते का?
काँग्रेस-राष्ट्रवादीने मेट्रो आराखडा हडपसरपर्यंत नेला होता, भाजपने हा मार्ग वगळला आहे. या मुद्दद्यावर आम्ही आक्रमक असताना मुख्यमंत्र्यांना निवेदने देऊन खोटी सहानुभूती मिळविणारे आमदार तेव्हा झोपले होते का? असा सवाल विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी व्यक्त केला आहे.
हडपसरचे अनेक प्रश्न गंभीर आहेत, साडेतीन वर्षांत आमदारांना हे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नाही, त्यातच जुन्या कामांचे भूमिपूजन करायचे, मोठे होर्डिंग लावायचे काम मात्र करायचे नाही; या भूलथापांना आता बळी पडणार नाहीत येथील प्रश्न प्रलंबित असताना आमदार महाशय काय करत होते?
– चेतन तुपे, विरोधी पक्षनेते
विरोधकांनी हडपसर मतदार संघामध्ये 4 मोठे कचरा प्रकल्प सुरू केले. ते आज बंद अवस्थेत आहेत. त्याचप्रमाणे कुंभारवाडा तसेच गाई म्हशींच्या गोठ्याचे पुर्नवसनही याच मतदार संघात केले आहे. त्यामुळे वाहतूक समस्या, कचरा डेपो, पुर्नवसन आदींमुळे मतदार संघातील नागरिक त्रस्त आणि नाराज आहेत. या सर्व नागरिकांची सरकारकडून अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले आहे. तिसर्या टप्प्यात निश्चितपणे शिवाजीनगर येथे हडपसर- शेवाळवाडी या मार्गावर मेट्रोचे काम सुरू होईल.
– योगेश टिळेकर, आमदार, हडपसर