यावल- हतनूर जलाशयातून कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी यावल अमळनेर चोपडा नगरपरिषदेसाठी पाणी सोडण्यात आले असून कालव्यावर सिंचनासाठी कोणीही इलेक्ट्रिक पंपाद्वारे पंपाद्वारे पाणी उचलू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. हातनूर जलाशयातून यावल व अमळनेर नगरपरिषदेने पिण्याच्या पाण्यासाठी मागणी केल्यामुळे पिण्याचे पाणी नागरिकांना सुरळीत मिळावे म्हणून जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशान्वये आरक्षित पाण्यातून पाणीपुरवठा सोडण्यात आला आहे.
तर गुन्हे होणार दाखल
कालव्यावर शेतीसाठी कोणीही इलेक्ट्रिक पंपाद्वारे पाणी उचलू नये व कालव्याचे गेटमधून पाणी कोणीही सोडू नये कालव्याचे नुकसान होईल, असे कृत्य कोणी करू नये याबाबत पेट्रोलिंग करण्यात येत असून असे कोणी आढळल्यास त्यांच्यावर सरळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील याबाबत पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व स्थानिक पोलिस पेट्रोलिंग करणार आहेत. कालव्याच्या होणार्या नुकसानीस चौकशीअंती आढळल्यास त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असे यावल येथील पाटबंधारे विभागाचे अभियंता एस.एच.चौधरी यांनी कळवले आहे. दरम्यान, हतनूर धरणावर दीपनगर भुसावळ शहर यांनासुद्धा पाणीपुरवठा उन्हाळ्यामध्ये पुरवठा व्हावा यासाठी जलाशयावरील हातनूर कालव्यावरील शेतीसाठी होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. अगोदर पिण्यासाठी पाण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याने कोणीही कालव्याची तोडफोड करू नये, असे पाटबंधारे विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे.