भुसावळ- हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाणी साठा वाढण्यास सुरुवात झाली असून सोमवारी सलग दुसर्या दिवशीही चार दरवाजे पूर्ण उघडून 119 क्युमेक्स प्रतीसेकंद अर्थात 4203 क्युसेस वेगाने विसर्ग करण्यात आला. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील बर्हाणपूर, टेक्सा, देडतलाई, लोहारा, चिखलदरा, ऐरडी, गोपाळखेडा आदी सर्व पर्जन्यमापक केंद्रांवर बुधवारपासून पावसाने हजेरी दिल्याने धरणात जलसाठा वाढत आहे. बर्हाणपूर व चिखलदरा येथे 100 मिलीमिटर पाऊस झाल्यानंतर धरणात मोठ्या प्रमाणावर साठा झाल्याने हतनूरमधून सकाळी पाच वाजता चार दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला. नंतर दुपारी व सायंकाळी आवक वाढल्याने विसर्गही वाढविण्यात आला. रविवारी देखील पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने हतनूरमधून सोमवारी विसर्गाचा वेग वाढला. सोमवारी दुपारी चार वाजता हतनूरची जलपातळी 208. 720 मिटरपर्यंत पोचली. 159.60 दलघमी जलसाठा कायम ठेवत धरणातून प्रतिसेकंद 119 क्युमेक्स अर्थात 4203 क्युसेस प्रतीसेकंद वेगाने विसर्ग करण्यात आला. रविवार आणि सोमवारी दोन दिवस हतनूरमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यावरही पुराचे पाणी अद्याप शहरातील तापी पात्रात पोहोचलेलेे नाही.