52 गावातील शेती सिंचनाखाली येणार : यंदा 30 टक्के साठ्याचे नियोजन
भुसावळ- वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्षात शुक्रवारी पासून हतनूर धरणातून वाहून जाणारे पाणी या योजनेवरील ओझरखेडा तलावात उपसा करून टाकण्याच्या कामास शुक्रवारपासून सुरुवात झाल्याने या परीसरातील शेतकर्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. यंदाच्या पावसाळ्यात 30 टक्के अर्थात 28 दलघमी जलसाठा या तलावात केला जाणार आहे. तब्बल 19 वर्षांपासून तहानलेल्या ओझरखेडा साठवण तलावात झालेल्या जलसाठ्यामुळे तीन तालुक्यातील तब्बल 52 गावांतील 16 हजार 948 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
19 वर्षानंतर शेतकर्यांचे स्वप्न झाले पूर्ण
वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेवरील 85.678 दलघमी क्षमता असलेल्या ओझरखेडा तलावात मार्च महिन्यातच दोन चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. 1999 मध्ये मूळ प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या योजनेतून साकारण्यात आलेल्या ओझरखेडा तलावात पाणी उपसा करण्यासाठी मात्र दिरंगाई झाली होती. शुक्रवारी सकाळी 11 वाजता या योजनेवरील हतनूर जॅकवेलवरील पंप कार्यान्वित करुन पाणी उचल करण्यात आली. हतनूर जॅकवेलवर दोन 270 अश्वशक्तीचे पाच पंप असून त्याती एकल स्टॅण्डबाय आहे. शुक्रवारी एक पंप कार्यान्वित करून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मातीचे धरण असल्याने पुढील वर्षी 100 टक्के 85.678 दलघमी पाणीसाठा केला जाईल. अर्थात हतनूर धरणाच्या सध्याच्या पाणीसाठवण क्षमतेच्या तुलनेत तो 40 टक्के राहिल.
आमदार आज देणार भेट
हतनूर जॅकवेल, ओझरखेडा तलाव व काहुरखेडा बुस्टर पंपाची शुक्रवारी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता प्रशांत मोरे, मुख्य अभियंता तथा कार्यकारी संचालक एस. डी. कुलकर्णी, उपसा सिंचन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांनी भेट देवून पाहणी केली. शनिवारी भुसावळचे आमदार संजय सावकारे पाहणी करणार आहेत.
योजनेसाठी पाठपुरावा केल्याने यश -आमदार
या योजनेसाठी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला असून हतनूर धरणातून पावसाळ्यात वाहून जाणारे हे पाणी जॅकवेलवरुन उचल करून ओझरखेडा साठवण तलावात टाकले जाणार आहे. बंदिस्त पाईप लाईनव्दारे भुसावळ, मुक्ताईनगर व बोदवड या तीन तालुक्यातील 52 गावांतील शेतीशिवारांना या पाण्याचा फायदा होवून 16 हजार 948 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.