जळगाव जिल्हावासीयांवर अन्याय : पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठा पणाला लावण्याची अपेक्षा
भुसावळ (गणेश वाघ) : तालुक्यातील वरणगावजवळील हतनूर पोलिस प्रशिक्षण केंद्रासाठी 1995 मध्ये मान्यता मिळाल्यानंतर तब्बल 106 एकर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आल्यानंतर तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात 1999 मध्ये जागेचे तत्कालीन गृहमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे, तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले होते मात्र पोलिस प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता नसल्याची बाब पुढे आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवल्यानंतर तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात गतवर्षी राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 19 ची स्थापना करण्यास व पदे भरण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती मात्र आघाडी सरकारने मंजूर केंद्रच थेट नगर जिल्ह्यात पळवल्याने जिल्हावासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वरणगावऐवजी नगर जिल्ह्यात हलवले केंद्र
गृह विभागाचे कार्यासन अधिकारी दिनेश सस्ते यांनी शुक्रवार, 26 रोजी एक आदेश काढला असून त्यात वरणगाव-हतनूर येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 19 चे कुसडगाव, ता.जामखेड, जि.अहमदनगर येथे हलवण्यास व मंजूर पदांसह व मंजूर आवर्ती/अनावर्ती खर्चासह स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याने जिल्हावासीयांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.
हा तर वरणगावसह जिल्हावासीयांवर अन्याय
1995 च्या काळात पोलिस प्रशिक्षण केंद्रासाठी हतनूर धरणाच्या परीसरात पवन नगर परीसरातील 106 एकर जागेचे भूसंपादन करण्यात आले होते. वरणगावात पोलिस प्रशिक्षण केंद्र होणार असल्याने या परीसरातील नागरीकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या मात्र आघाडी सरकारने थेट हे केंद्रच आता नगर जिल्ह्यात हलवल्याने जिल्हावासीयांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
भाजपा सरकारच्या पदांनीही मिळाली होती मंजुरी
गतवर्षी भाजपा सरकारच्या काळात हतनूर पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या जागेवर राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 19 ची स्थापन करण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती तसेच तत्कालीन जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यासाठी प्रयत्न केले होते. मंत्री मंडळ बैठकीत या केंद्राकरीता 1384 पदांची निर्मिती करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती तसेच राज्य राखीव पोलिस बल गट निर्मितीसाठी एकूण 56.61 कोटी आवर्ती व 81.01 कोटी अनावर्ती खर्चास राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली होती. हे प्रशिक्षण केंद्र भुसावळ तालुक्याच्या विकासामधील मैलाचा टप्पा ठरणार असताना आघाडी सरकारने हे केंद्र नगर जिल्ह्यात हलवल्याने वरणगावसह जिल्ह्यातून नाराजीची भावना व्यक्त होत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आता प्रतिष्ठा पणाला लावावी व केंद्र पूर्ववत जिल्ह्यात आणण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शासन निर्णयाचा निषेध : सुनील काळे
तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्व.गोपीनाथ मुंड व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हतनूर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर करून त्याचे भूमिपूजन केले होते तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री गिरीश महाजन व आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी या पोलिस प्रशिक्षण केंद्रासाठी (आत्ताचे राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 19) निधी सुद्धा मंजूर केला होता मात्र आताच्या सरकारने हे केंद्र रद्द करून ते अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुडसूड या गावी हलवून जळगाव जिल्ह्यावर एका प्रकारे अन्याय केला असल्याची भावना वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका माला मेढे, मेहनाज इरफान पिंजारी, अजय पाटील, संजय जैन, शामराव धनगर, सुनील माळी, प्रवीण ढवळे, शेख अल्लाउद्दीन सेठ यांनी व्यक्त केली.
हा तर जिल्ह्यावरच अन्याय -आमदार संजय सावकारे
राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 19 नगर जिल्ह्यात हलवण्यात येत असल्याची बाब निश्चितच दुर्दैवी असून हा एक प्रकारे जिल्ह्यावर अन्याय आहे. या संदर्भात सभागृहात आवाज उठवू, असे भाजपा आमदार संजय सावकारे म्हणाले. जागेचा तुम्ही उपयोग करणार नसेल तर शेतकर्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत द्या, अशी मागणीही आपण करणार असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठा लावावी : एकनाथराव खडसे
पालकमंत्र्यांनी आता प्रयत्न करून प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यात हलवण्याचा घाट रद्द करावा, अशी भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली. सर्व लोकप्रतिनिधींनी आता एकत्र येवून यासाठी आवाज उठवणे गरजेचे असल्याचेही खडसे म्हणाले.