प्रांताधिकार्यांचे आदेश ; भरारी पथक अचानक करणार तपासणी
भुसावळ- भुसावळसह दीपनगर, मध्य रेल्वेसह जळगाव एमआयडीसीसाठी हतनूर धरणातून 24 रोजी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे मात्र या पाण्याची अनधिकृतरीत्या उचल केली जात असल्याने अशा लोकांवर कारवाईचे आदेश प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिले आहेत. कारवाईसाठी तहसीलदार, मुख्याधिकारी लघूपाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी, वीज कंपनीचे उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता तसेच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांचे भरारी पथक गठीत करण्यात आले असून हे पथक अनधिकृतरीत्या पाण्याची उचल करणार्यांवर कारवाई करणार आहे.
तर कडक कारवाई होणार
हतनूर धरण ते तापी नदीदरम्यान कुणीही शेतकरी थ्री फेज वीजपुरवठ्याद्वारे पाण्याची उचल करताना आढळल्यास वा अनधिकृतरीत्या मोटारी टाकून पाण्याची उचल करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकार्यांनी दिला आहे. भरारी पथक अचानक केव्हाही जावून तपासणी करणार असल्याचे कळवण्यात आले आहे.