हतनूरला विषबाधेने नऊ गुरांचा मृत्यू

0

गुरे मालकांचे पाच लाखांचे नुकसान ; महसूल विभागाकडून पंचनामा

भुसावळ- तालुक्यातील हतनुर येथे गुरांना विषबाधा झाल्यामुळे नऊ गुरांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत गुरे मालकांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे. गुराखी बाळू यशवंत सुरवाडे व संदीप भागेश्वर हे दोघे गावातील व स्वतःची गुरे चारण्यासाठी हतनूर शिवारातील शेतमालक वसंत विश्वनाथ महाजन यांच्या शेतात गेले होते मात्र केळी खोड खाल्याने सायंकाळी गुरे घरी आल्यानंतर काही गुरांना अचानक चक्कर व तोंडातून फेस आल्यानंतर तब्बल नऊ गुरांचा मृत्यू झाला. गुरे मालकांनी खाजगी पशुवैद्यकीय अधिकार्‍याना बोलावल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

गुरे मालकांची भरपाईची मागणी
गुरे मालक बाळू सुरवाडे यांच्या दोन वासरूंसह जरशी गाय, दोन म्हशी, एक पार्डीसह गोर्‍हा मिळून सात गुरांचा मृत्यू झाला तर भास्कर नामदेव पाटील यांचा एक गोर्‍ह्यासह कांतीलाल संतोष पाटील यांच्य ामालकीची म्हैस अशा एकूण नऊ गुरांचा मृत्यू झाला. गटविकास अधिकारी ए.एन.भाटकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सलीम तडवी, डॉ.टी.एम.पिचड, डॉ.पी.ई.चौधरी, डॉ.उत्तम पवार, डॉ.यू.एल.पवार, डॉ.गिरीष पाटील आदींनी भेट दिली. महसूल विभागाचे तलाठी मनीष रत्नानी यांनी मृत्यू झालेल्या नऊ गुरांचा पंचनामा केला.