हतनूर धरणाची जलपातळी घसरली

0

20 पाणी वापर संस्थांचा पाणीपुरवठा खंडीत होण्याची भीती

भुसावळ- हतनूर धरणावर अवलंबून असलेल्या तब्बल 20 पाणीवापर संस्थांचा पाणीपुरवठा लवकरच खंडित होण्याची शक्यता असून या संदर्भात हतनूरच्या उपविभागीय अभियंत्यांनी पत्र देत पाणी वापर संस्थांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करावे, या संदर्भात पत्र दिल्याचे समजते. आजमितीला धरणाची जलपातळी 210 मीटरपर्यंत घसरल्याचे धरणावरील सूत्रांनी सांगितले.

20 पाणी वापर संस्थांना दिले पत्र
आयुध निर्माणी वरणगाव, आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुतगिरणी मुक्ताईनगर, संत मुक्ताई शुगर कंपनी मुक्ताईनगर, पाणी पुरवठा विभाग नांदूरा पाच गावे, ग्रामिण पाणीपुरवठा योजना 22 गावे नांदूरा, पिंप्राळा, कुर्‍हा, नगरपंचायत मुक्ताईनगर, टाकळी, महालखेडा, काकोडा, वढवे, बोदवड, कोल्हाळा ता. मुक्ताईनगर, 81 गावांची पाणीपुरवठा योजना, एमआयडीसी मलकापूर, नगरपालिका मलकापूर, रावेर, सावदा व गहूखेडा पाच गावांची योजना अशा 20 पाणीवापर संस्थांना पाण्याचे काटेकोर नियेाजन करण्यासंदर्भातील पत्र हतनूरच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिल्याचे समजते. दरम्यान, हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात पावसाळ्यात मान्सूनोत्तर आवक कमी झाल्याने 8 एप्रिल रोजी धरणाची पातळी 210 मिटरपर्यंत खालावल्याने भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.