हतनूर धरणाचे चार गेट उघडेच ; धरण साठ्यात वाढ

0

लाभक्षेत्रात पाऊस सुरूच ; पुरामुळे नदीकाठावर सतर्कतेचा इशारा

भुसावळ- हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये 38 मिलीमीटर पाऊस झाल्याने धरणाचे आता केवळ चार गेट पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी धरणात पाण्याची आवक वाढल्यानंतर पहाटे हतनूरचे 12 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले होते तर 3 रोजी रात्री नऊ वाजता चार गेट बंद करण्यात आले तर गुरुवारी पुन्हा दुपारी तीन वाजेच्या सुमारास चार गेट पूर्ण बंद करण्यात आल्याने आता केवळ चार दरवाजातून प्रतिसेकंद 147 क्युमेस प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. धरणाच्या पाण्याने तापीला पुर आला असून तापी व पूर्णा काठच्या रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणार्‍या तापी व पूर्णानदीच्या पर्जन्यमापन केंद्रांवर गेल्या 24 तासांमध्ये 38 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास धरणाची जलपातळी 208.910 मीटर तर 164.30 मिलीमीटर जलसाठा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भुसावळात रीपरीप कायम
गुरुवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पावसामुळे आधीच दुरवस्था असलेल्या रस्त्यांची आणखीन बिकट अवस्था झाली आहे. वाहनधारक घसरण्याचे प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पालिकेकडून मात्र रस्त्यांची डागडूजीदेखील केली जात नसल्याने वाहनधारक संतप्त झाले आहेत.