भुसावळ- जिल्ह्याला संजीवनी ठरलेल्या हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणात पाण्याची सातत्याने आवक वाढत आहे. सोमवारी दहा दरवाजे पूर्ण उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दहा दरवाजांतून प्रतीसेकंद पाच हजार 509.92 क्युसेस विसर्ग करण्यात आला. हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात 21 जून रोजी झालेल्या पावसामुळे शनिवारी धरणाची आवक वाढली होती. सुरवातीला चार तर नंतर पुन्हा दोन असे एकूण सहा दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला होता. पाण्याची आवक वाढल्याने सोमवारी एकूण दहा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले.
तापीच्या उगमस्थानावर पर्जन्यवृष्टी
सोमवारी 10 दरवाजांतून प्रतीसेकंद 5 हजार 509.92 क्युसेस वेगाने विसर्ग करण्यात आला. हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात येणार्या बर्हाणपूर व तापीच्या उगमस्थानावर झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. विसर्गानंतरही हतनूर धरणात 208.260 मीटर जलपातळी तर 146.80 दलघमी जलसाठा कायम आहे. हतनूरमधून यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दहा दरवाजे पूर्ण उघडून विसर्ग करण्यात आल्याने तापीचे कोरडे झालेले पात्र खळाळले आहे. तापी नदी दुथडी भरुन वाहत आहे. विभागातील नदीनाल्यांनाही पूर आल्याने भुजल पातळी वाढीसाठी मदत होणार आहे.