हतनूर धरणाचे वाहून जाणारे पाणी ओझरखेडा धरणात सोडा

खासदार रक्षा खडसे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

मुक्ताईनगर : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणाचे दरवाजे उघडून त्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे मात्र त्यातून वाहून जाणार्‍या पाण्याचा जिल्हावासीयांना उपयोग होण्यासाठी वाहून जाणारे पाणी आत्ताच ओझरखेडा धरणात सोडावे, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आमदार गिरीष महाजन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

तर शेतकर्‍यांना मिळणार मोठा दिलासा
ओझरखेडा धरणाची पातळी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कमी होऊन शेतकर्‍यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. ओझरखेडा धरणाचे पाणी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रासाठी राखीव असल्याने या धरणाची पातळी कमी झाल्यानंतर शेतकर्‍यांना पाणी मिळण्यास अडचणी येतात. सध्या चांगला पाऊस पडत असल्याने हतनूर धरणातून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. हतनूर धरणातून वाहून जाणारे पाणी आताच ओझरखेडा धरणात सोडण्यात आले तर पुढील काळात धरणाची पातळी चांगली राहून धरण लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना पुरेसे पाणी मिळून अडचणी येणार नाहीत, असेही खासदारांनी आपल्या मागणीपत्रात नमूद केले आहे.

वेळीच दखल घेतल्यास होणार फायदा
हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याबाबत मागील वर्षी वेळोवेळी मागणी करून सुद्धा पाणी सोडण्यात आलेले नव्हते. शेवटी सप्टेंबर महिन्यात केवळ दोन दिवसांसाठी पाणी सोडण्यात आले होते त्यामुळे शेतकर्‍यांना खूप त्रास झाला होता. यंदा मात्र वेळीच दखल घेवून पाणी सोडण्यात यावे, असे खडसे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.