हतनूर परिसरात आढळल्या पक्ष्यांच्या 120 प्रजाती

0

चातक संस्थेतर्फे निरीक्षण व गणना ; देश-विदेशातील पक्ष्यांचा मुक्काम

भुसावळ- तालुक्यातील हतनूर धरण व परीसरात यंदा पक्ष्यांच्या विविध 120 प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. चातक संस्थेतर्फे झालेल्या पक्षी गणनेत ही बाब समोर आली. यात प्रामुख्याने वारकरी, वैष्णव, नदीसुरय, पाणकावळे, शेंडीबदक, वंचक, लहान बगळे, मोठे बगळे, खंड्या, शंकर, गढवाल, छोटा शराटी, कृष्ण थिरथिरा, चातक व निळ्या गालाचा वेडा राघू या दुर्मिळ पक्षांचेसुद्धा दर्शन झाले.

‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ यांच्या जन्मदिनानिमित्त पक्षी गणना
12 नोव्हेंबर हा दिवस ‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ डॉ. सलीम अली यांचा जन्मदिवस म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारतीय पक्षीशास्त्राचा पाया रचणार्‍या डॉ. सलीम अली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेतर्फे पक्षी निरीक्षण व पक्षी गणना करण्यासंदर्भात आवाहन करण्यात येते. यावर्षीही भारतभर ठिकठिकाणी विविध अभ्यासक तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्थेतर्फे पक्षी निरीक्षण व पक्षी गणना केली. चातक निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे हतनूर धरण व परीसर या आयबीए (महत्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र) दर्जा प्राप्त परिसरात पक्षी निरीक्षण व पक्षी गणना केली. यात दरवर्षीप्रमाणे हिवाळ्यात मंगोलिया, तिबेट, चीन, उत्तर भारत, उत्तर रशिया या भागातून स्थलांतर करुन येणार्‍या पक्षांची संख्या शेकडोंनी दिसून आली. काही दुर्मिळ व संकटग्रस्त प्रजातींचीही नोंद करण्यात आली.

यांचा पक्षी गणनेत सहभाग
चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष व पक्षीअभ्यासक अनिल महाजन, सचिव उदय चौधरी, विलास महाजन, विठ्ठल भरगडे, डॉ.राहुल भोईटे, निलेश बेंडाळे, प्रशांत पाटील, संजय पाटील, डॉ. सारंग पाटील, सौरभ महाजन, पियुष महाजन, स्वाती वानखेडे, ज्योती वानखेडे, पुष्कर भोईटे, रेणू भोईटे, देवांग देशपांडे यांच्यासह वेगवेगळे पक्षी अभ्यासक, पक्षीतज्ञ अभ्यासक उपस्थित होते.