कोल्हापूरातील हत्तीच्या प्रश्नांवर विधानसभेत लक्षवेधी
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली घोषणा
मुंबई :- कोल्हापूर जिल्ह्यातील जंगली हत्ती आणि गव्यांच्या प्रश्न कायमस्वरूपी सोडण्यासाठी एका समितीची घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. आमदारांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीने जंगली हत्ती आणि रानगव्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात दिलेल्या अहवालांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल असेही वनमंत्र्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये जंगली हत्तीआणि रानगव्यांमुळे शेतीचे प्रंचड नुकसान होते. या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने केलेली नियमावली ही शेतकऱ्यांसाठी जाचक असल्यामुळे शासनाने यावर योग्य तो निर्णय घ्यावा आणि जंगली हत्ती आणि रानगव्यांचा विषय तात्काळ मार्गी लावावा यासंदर्भातील लक्षवेधी आमदार संध्यादेवी देसाई-कुपेकर यांनी विधानसभेत उपस्थित केली होती.
जंगली हत्तीचा प्रश्न गंभीर
या लक्षवेधीला उत्तर देतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की कोल्हापूर जिल्ह्यातील जंगली हत्तीचा प्रश्न गंभीर झालेला आहे. हत्तीवर नियंत्रण कसे मिळवायचे यासाठी महाराष्ट्राकडे प्रशिक्षित असे मनुष्यबळ नाही. हत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्नाटक सरकारकडून मदत मागविण्यात आलेली आहे.मात्र कर्नाटकातच हत्तीचा प्रश्न गंभीर असल्यामुळे मे अखेर पर्यंत मिळणार नाही असे सांगितले आहे. तसेच कर्नाटकातून आलेले हत्ती परत कर्नाटकात पाठवू नका अशी विनंती कर्नाटकाने महाराष्ट्राला केली असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.
हत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्नाटकाकडून प्रशिक्षण
कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकातून ७ हत्ती आले आहेत. यामध्ये दोन नर हत्ती आणि ५ मादी हत्ती आहेत. या हत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारकडे यंत्रणाच नाही कारण हा प्रश्न आतापर्यंत उपस्थित झाला नव्हता. हत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र सरकार हे कर्नाटक सरकारकडून मदत घेणार असून मे मध्ये कर्नाटक सरकारचे पथक येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगूंटीवार यांनी दिली. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत जयंत पाटील यांनी यावर सुचना करतांना सांगितले की, भविष्यात देखील हा प्रश्न वाढतच जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी कर्नाटक सरकारकडे मदत मागण्यापेक्षा आपल्याच लोकांना कर्नाटकात पाठवून त्यांना प्रशिक्षण घेण्यात यावे असे सांगितले. जयंत पाटील यांनी केलेल्या सुचनेवर वनमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली.
नांगर,पाईप आणि बैलगाडीलाही मदत मिळणार
हत्ती आणि गव्यांमुळे शेतात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यामध्ये शेतात असलेले नांगर, बैलगाडी, पाण्याचा पाईप, शेतातील प्लॅस्टिकच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, सिमेंट खांब, इत्यादीचा समावेश हा नुकसान भरपाईसाठी करण्यात येत नाही. त्यामुळे यासर्व गोष्टीचा समावेश नुकसान भरपाई साठी करण्यात यावा अशी मागणी आमदार संध्यादेवी देसाई-कुपेकर, आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली होती. तसेच अनेक पिकांचा देखील नुकसानीमध्ये समावेश नसल्याचे सांगितले होते. यावर उत्तर देतांना नांगर,बैलगाडी, पाईप यासह ज्या गोष्टींची मागणी करण्यात आलेली आहे. त्या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात येईल असे सांगितले.