नवी मुंबई : अनेक वर्षापासून प्रेम करणार्या प्रेयसीचा साखरपुडा ठरल्याचा राग मनात धरून तिची हत्या करणार्या प्रियकराला पोलिसांनी अवघ्या 12 तासात अटक केली आहे. इम्रान खुद्देश सलमानी (20) असे त्या प्रियकराचे नाव असून तो सिउड येथील ग्रेसफुल सलून मध्ये हेअर कटिंगचे काम करतो. प्रेयसीचा साखरपुडा ठरल्याचे त्याला कळले असता त्याने रविवारी तिला सलूनमध्ये बोलावले आणि त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास तिची हत्या केली. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते बॅगेत भरून ते इम्रानने खाडी किनारी फेकून दिले होते.
या प्रकरणाची चौकशी करत असतांना मयत तरुणीचे नाव मरियम शेख (22) असे असल्याचे उघडकीस आले असून ती गोवंडी मध्ये राहत होती. ती इम्रान काम करत असलेल्या सलूनमध्ये काम करत होती. चार वर्षापूर्वी इम्रान व मरियम हे दोघे चेंबूर मधील एकाच सलून काम करत होते. तेव्हापासून इम्रान तिच्यावर प्रेम करत होता. पोलिसांनी चौकशीअंती इम्रानला करावे गावातून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.