मुंबई – हत्येच्या गुन्ह्यांतील एका फरारी आरोपीस अखेर गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. येतेंद्रसिंग अजबसिंग चौहाण असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुन्हा नाशिक कारागृहात पाठविण्यात आले आहे. पॅरोलवर सुटल्यानंतर येतेंद्रसिंग हा कानूपरमधील एका शाळेत सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असल्याचे पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले. 2006 साली चंद्रेश सिंग नावाच्या एका तरुणाची येतेंद्रसिंग याने गोळ्या झाडून हत्या केली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला नंतर याच गुन्ह्यांत अटक केली होती. या गुन्ह्यांत त्याला विशेष सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
शिक्षा झाल्यानंतर त्याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. जून 2014 रोजी त्याने पॅरोलसाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन त्याला एक महिन्यांच्या पॅरोलवर सोडून देण्यात आले होते. पॅरोलवर बाहेर येताच तो पळून गेला होता. पॅरोलची मुदत संपल्यानंतर तो परत न आल्याने त्याच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी शोधमोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच येतेंद्रसिंग हा कानपूर येथील तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी महेश देसाई यांच्या पथकातील आशा कोरके, किशोर पाटील, नितीन पाटील, शरद थराडे, नाईक, शिर्के, जाधव, वारंगे, प्रविण कांबळे, महांगडे, शितल पुजारी यांनी तिथे एक पथक पाठविले होते. या पथकाने तिथे सात दिवस पाळत ठेवून येतेंद्रसिंगला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो येतेंद्रसिंग असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला नाशिक रोड पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. त्यांच्याकडून त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.