अंबरनाथ । अंबरनाथ पूर्व येथील म्हाडा सर्कल परिसरातील पाईपलाईन रोडलगत ऑर्चिड पेटल्सच्या पाठीमागील पडीक मैदानाजवळील झाडाझुडपात 3 दिवसांपूर्वी कविता पाटोळे (30) या महिलेचा खून झालेल्या अवस्थेत सडलेला मृतदेह शिवाजीनगर पोलिसांना मिळून आला होता. तो खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले असून लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिचा खून प्रियकर विशाल कदम (21) या तरूणाने केल्याचे उघडकीस आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीला पोलीस कोठडी
विशाल कदम हा रिक्षाचालक असून त्याचे वर्ष-दिड वर्षापासून कविता हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यादिवशी त्याने कविता हिला फिरायला नेऊन झाडाझुडपाच्या ठिकाणी बसवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. पण तिने लग्नाचा तगादा लावल्याने विशाल याने तिला नकार दिल्यावर त्यांच्यात भांडण झाले. त्यावेळी विशाल याने कविता हिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. पो.नि.(गुन्हे) सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.डांगे, गोसावी आदी पोलिसांनी हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणून विशाल कदम याला अटक केली आहे. त्याला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. अधिक तपास पो.नि.(गुन्हे) सुनील जाधव करीत आहेत.