हद्दीपारीच्या आदेशाचे उल्लंघण : भुसावळातील खरात बंधू पोलिसांच्या जाळ्यात
पोलिस कारवाईला विरोध केल्याने तिघांविरोधात गुन्हा : गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ : हद्दपार असताना आदेशाचे उल्लंघण करून शहरात आलेल्या माजी नगरसेवक राजकुमार रवींद्र खरात व राजन उर्फ गोलू रवींद्र खरात (समता नगर, भुसावळ) यांना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी अटक केली. दरम्यान, अटकेप्रसंगी पोलिसांच्या कारवाईला विरोध करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने दोघांसह रजनी रवींद्र खरात यांच्यविरोधात भुसावळ शहर पोलिसात सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. राजकुमार व राजन यांना अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील समता नगरातील रहिवासी राजकुमार व राजन रवींद्र खरात यांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले असतानाही ते शहरातील समता नगरातील निवासस्थानी आल्याची गोपनीय माहिती भुसावळ शहर पोलिसांना सोमवारी रात्री मिळाली होती. त्यानुसार शहरचे पोलिस निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह दोन्ही पोलिस ठाण्यातील डीबी स्टाफ खरात यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री आठ वाजता धडकला मात्र संशयीत घरात दरवाजा उघडत नसल्याने पोलिसांनी पहिल्या मजल्यावरील लोखंडी दरवाजा तोडला व त्याचवेळी रजनी खरात यांनी आरडा-ओरड करीत पोलिसांना वरच्या मजल्यावर जाण्यास मज्जाव करीत घरातील सिलिंडर लीक करण्याची धमकी देत वरच्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी दिली तसेच महिला पोलिस कर्मचारी आशा तडवी यांच्याशी धक्काबुक्की केली तसेच खरात बंधूंनी एएसआय मोहम्मद वली सैय्यद यांच्याशी धक्काबुक्की केली. प्रसंगी राजकुमारच्या अंग झडतीत चाकू जप्त करण्यात आला.