हनुमंतखेडा येथे शांतता समितीची बैठक

0

सोयगाव । तालुक्यातील हनुमंतखेडा येथील ग्रामस्थांच्या मनातील हत्येचे भय अद्यापही दूर न झाल्याचे पाहून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गावात शांतता कमेटीची बैठक मंगळवारी 8 ऑगस्ट रोजी घेण्यात येवून ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांनी ग्रामस्थांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे मनातील दुख हलके होवून भीती दूर होण्यास मदत झाल्याचे उज्ज्वला वनकर यांनी सांगितले.

अफवांना बळी न पडण्याचे आवाहन
हनुमंतखेडा येथील अल्पवयीन बालिकेचा चार ते पाच नराधमांनी हत्या करून तिचा मृतदेह घाटात फेकून दिल्याच्या घटनेला पंधरवडा उलटला तरीही अद्याप गावातील भय दूर झालेले नाही. ही गोष्ट पोलीस प्रशासनाच्या लक्षात आल्यावरून तातडीने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उज्ज्वला वनकर यांनी भेट देवून गप्पा मारून ग्रामस्थांना बोलते केले. यावेळी उज्ज्वला वनकर यांनी सांगितले कि, सीमा राठोड हत्याप्रकरणी सर्व आरोपी अटक करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, पोलिसांच्या संपर्कात राहून तपासासाठी सहकार्य करावे. सदर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे असे सांगितले.

यांची होती उपस्थिती
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, सरपंच दादाभावू चव्हाण, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, विलास राठोड, सोयगावचे पोलीस निरीक्षक सुजित बडे, सिल्लोडचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, उपनिरीक्षक गणेश जागडे आदींसह सिल्लोड, सोयगाव पोलीस कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. आभार सुजित बडे यांनी मानले. दरम्यान अचानक घटनेच्या पंधरा दिवसानंतर पुन्हा हनुमंतखेड्यात पोलिसांचा ताफा दाखल झाल्याने ग्रामस्थांची मोठी भंबेरी उडाली होती. परंतु शांतता कमेटीच्या बैठकीसाठी पोलीस गावात आल्याचे कळताच ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.