नवी दिल्ली : हेरखात्याच्या हालचाली सावलीसारख्या असतात. त्याची जितकी माहिती मिळते वा दिली जाते, त्यापेक्षा अधिक दडपली जात असते. कुलभूषण जाधवबाबतीत पाकिस्तानने तोच खेळ केला असून, त्याला शह देण्यासाठीच भारतानेही काही खेळी केलेली असल्याचे ऐकायला मिळत आहे. कुलभूषणची अदलाबदली करता यावी, म्हणून भारतानेही एका पाक लष्करी निवृत्त अधिकार्याचे अपहरण केले असल्याचा पाकला संशय आहे.
गेल्याच आठवड्यात पाकिस्तानचा निवृत्त लेफ़्टनंट कर्नल महंमद हबिब झाहीर नेपाळमधून बेपत्ता झालेला आहे. पाकिस्तानहून ओमानला नोकरीच्या शोधात गेलेल्या हबिबला नेपाळला जाण्यास सांगण्यात आलेले होते. पण तिथे पोहोचल्याचे आपल्या पत्नीला कळवल्यापासून हबिब बेपत्ता आहे आणि भारतीय हेरखात्यानेच त्याचे अपहरण केले असावे, असा पाकला संशय आहे. त्याला भारताच्या तावडीतून सौदा करून सोडवण्यासाठीच कुलभूषण जाधवला अकस्मात फ़ाशी ठोठावल्याची बातमी आली आहे. पण त्यामागे हबिबला सोडवण्याची खेळी असावी, असा या क्षेत्रातील जाणत्यांना संशय आहे.
हबिब नोकरीसाठी ज्यांना भेटला व ज्यांच्या आदेशावरून ओमान व नेपाळला गेला, त्यापैकी कोणाचाच ठावठिकाणा मिळत नसून, भारतानेच त्याचे अपहरण केले असावे, असा पाकचा होरा आहे. त्यामुळेच कुलभूषणला फ़ाशी होत असल्याचे भासवून बदल्यात हबिबला सोडवण्याची खेळी पाक खेळतो आहे. मात्र, अजून तरी भारताने हबिब नावाच्या पाक हेराला पकडल्याचे वा तो आपल्याच ताब्यात असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. पण कुलभूषणला वाचवण्यासाठी भारत स्वत:च अशा सौद्याला पुढे येईल, अशी पाकची आशा आहे. म्हणूनच कुलभूषणच्या फाशीचा गवगवा करून भारत सरकारवर जनमताचा दबाव आणण्याची खेळी केली असावी, असे जाणते म्हणतात.