आरोपीला अटक ; अनधिकृतरीत्या हमाली करण्याच्या वादातून घटना
भुसावळ- हमाली करण्याचा कुठलाही अधिकृत परवाना नसताना रेल्वे स्थानकावर तु हमाली का करतोस? असा जाब विचारल्याने दोन हमालांमध्ये वाद विकोपाला गेल्याने एकाने दुसर्या डोक्यात लोखंडी फावडा टाकून मारहाण केल्याची घटना रेल्वे स्थानकाबाहेर दर्गा ते जुन्या पालिकेजवळील कमल हॉटेलजवळ शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी संशयीत आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. जमीलखान अमानउल्ला खान (भुसावळ) यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून संशयीत आरोपी फकिरा मोहम्मद गवळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार व त्यांचे सोबतचे सहकारी अफसर शेख अहमद शेख (भुसावळ) हे रेल्वे स्थानकावर हमालीचा व्यवसाय करतात मात्र त्यांच्याकडे त्याबाबत अधिकृत लायसन्स नाही. याच कारणावरून संशयीत आरोपी फकिरा गवळी यांनी उभयंतांशी शुक्रवारी रेल्वे स्थानकावर वाद घातला. शाब्दीक वाद विकोपाला गेल्याने आरोपी गवळी यांनी संतापाच्या भरात अफसर शेख यांच्या डोक्यात लोखंडी पावडा मारून दुखापत केली. या घटनेने रेल्वे स्थानक परीसरात मोठी खळबळ उडाली. जखमी शेख यांच्यावर शहरातील डॉ.राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्यांच्या डोक्याला 16 टाके पडल्याचे सूत्रांनी सांगितले. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील व विकास सातदिवे यांनी संशयीत आरोपीस अटक केली. तपास हवालदार माणिक सपकाळे करीत आहेत.