मुंबई । शेतकरी खरीपातील काढणी केलेला मूग, उडीद, सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, बाजारात त्याला हमीभावाइतका दर मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मार्केटिंग अधिकार्यांची उदासीनता जबाबदार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. किमान आधारभूत किंमतीने शेतमाल खरेदीच्या बाबतीत चालढकल करणार्या अकोला आणि अहमदनगरच्या जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांना त्यांची कामातील उदासीनता चांगलीच भोवली आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकर्यांशी स्वतः बोलून खात्री केल्यानंतर पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी संबंधित दोन्ही जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
शेतमालाची आगाऊ नोंदणी
शेतकर्यांच्या मालाला बाजारात हमीभावाइतका भाव मिळत नसल्याने केंद्राच्या मान्यतेने राज्य सरकारने पणन महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात ठिकठिकाणी खरेदी केंद्रे सुरु केली आहेत. 18 ऑक्टोबरपासून किमान आधारभूत किंमतीने सोयाबीनची तर 16 ऑक्टोबरपासून मूग आणि उडिदाची खरेदी सुरु करण्यात आली आहे. त्याआधी शेतकर्यांनी स्वतःकडील शेतमालाची आगाऊ नोंदणीही संबंधित केंद्रांवर केली आहे. सोयाबीनची 136 केंद्रे, मूगासाठी 86 आणि उडीद खरेदीसाठी 89 हमीभाव केंद्रे सुरु आहेत.
पणन मंत्र्यांकडे आल्या तक्रारी
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या स्तरावर शेतमाल खरेदीत उदासीनता आढळून येत आहे. पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे याबाबतच्या तक्रारी आल्या होत्या. अकोला आणि नगर जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकर्यांना मंत्री देशमुख यांनी स्वतः फोन केले. यावेळी शेतकर्यांनी त्यांना नोंदणीनंतर खरेदी केंद्रावर कधी शेतमाल आणायचा याचे मोबाइल संदेश आला नसल्याचे सांगितले.