‘साराभाई’नंतर १९९५ आणि २००५ मध्ये छोट्या पडद्यावर गाजलेली, विद्या बालनला ब्रेक देणारी, मिडल क्लास माथूर जोडपं आणि त्यांच्या पाच मुलींची कथा असलेली, ‘हम पाँच’ ही मालिका आता नव्या रुपात ‘हम पाँच फिर से’ या नावाने ‘टीव्ही’वर दाखविली जाणार आहे. ‘झी टीव्ही’वर प्रदर्शित होणारी ही मालिका तेव्हा प्रचंड गाजली होती; मालिकेतल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते.
‘हम पाँच’च्या मागील दोन सिझनची निर्मिती एकता कपूरने केली होती. आता ‘हम पाँच फिर से’ची निर्मिती ‘एस्सेल व्हिजन प्रॉंडक्शन्स’ करत आहे. यावेळी मालिकेला एक मॉडर्न टच देण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. गेल्यावेळी अशोक सराफ यांनी साकारलेल्या आनंद माथूरची भूमिका आता अभिनेता सूरज थापर साकारणार आहे. तर प्रिया तेंडुलकर यांनी साकारलेल्या ‘मिसेस माथूर’च्या भूमिकेत आता बैष्णकी महंत असेल. दुसऱ्या पत्नीच्या भूमिका सीमा पांडे साकारतेय. काजल भाईच्या जबरदस्त गाजलेल्या भूमिकेत जयश्री व्यंकटरामनन दिसेल. विद्या बालनची राधिकाची भूमिका आता अंबालिका सप्रा करणार आहे.