हयगय केल्यास गंभीर कारवाई

0

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना
दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकर्‍यांचा समावेश
21 पर्यंत यादी तयार करण्याचे आदेश

जळगाव । केंद्रिय अर्थसंकल्पात घोषीत झालेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीत अधिकारी किंवा कर्मचार्‍यांनी हयगय केल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा समन्वयक तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी आज प्रशिक्षण कार्यशाळेत दिला. या कार्यशाळेत व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, महसुल उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकुर उपस्थित होते. केंद्र शासनाने देशातील शेतकर्‍यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना अंमलात आणली आहे. या योजनेंतर्गत 2 हेक्टरपर्यंतची शेतजमीन असलेल्या कुटुंबाला वार्षिक 6 हजार रूपये तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आज जिल्हास्तरीय समितीने नियोजन भवनात प्रांताधिकारी, तहसीलदार आणि तलाठ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा घेतली.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्या शंकाचे निरसन केले.

असा आहे कालबध्द कार्यक्रम
या योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाने कालबध्द कार्यक्रम आखुन दिला आहे. दि. 7 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत गावनिहाय पात्र खातेदार शेतकर्‍यांची यादी तयार करून त्याची खात्री करणे, दि. 10 ते 12 फेबु्रवारी- कुटुंबनिहाय वर्गीकरण करून खात्री करणे, दि. 7 ते 15 फेब्रुवारी- संगणकीकृत माहितीचे संकलन करणे, दि. 15 ते 20 फेबु्रवारी- शेतकरी कुटुंबाची यादी गावात प्रसिध्द करून हरकती मागविणे, दि. 20 ते 21 फेबु्रवारी- यादी दुरूस्ती करून शेतकरी कुटुंबाची अंतीम यादी तहसील कार्यालयात सादर करणे, दि. 22 ते 26 फेबु्रवारी – तहसील स्तरावर प्राप्त यादी पीएम- किसान या पोर्टलवर अपलोड करणे असा कार्यक्रम आखुन देण्यात आला आहे. यादीवर प्राप्त झालेल्या हरकतींबाबत तालुकास्तरीय समितीचा निर्णय अंतीम राहणार आहे.

आधार कार्ड आवश्यकच
योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय समितीचे समन्वयक तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी माहिती दिली. या योजनेचा लाभ शेतकर्‍यांना देण्यासाठी त्यांचे आधार लिंक असलेले खाते क्रमांक घ्यावे लागणार आहे. ज्या शेतकर्‍यांकडे आधार नाही किंवा ते लिंक नाही अशा शेतकर्‍यांना पहिला हप्ता दिला जाईल. मात्र दुसर्‍या हप्त्यासाठी त्यांना आधार कार्ड लिंक झाल्याशिवाय लाभ मिळणार नाही. तसेच या योजनेत शेतकरी, त्याची पत्नी आणि 18 वर्षाखालील मुले असे अशी कुटुंबाची व्याख्या करण्यात आली असुन आहे.

3 लाख 67 हजार 275 शेतकरी
या योजनेत अत्यल्प आणि अल्प भुधारक शेतकर्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात अत्यल्प भुधारक असलेले 1 लाख 94 हजार 457 तर अल्पभुधारक असलेले 1 लाख 72 हजार 818 असे एकुण 3 लाख 67 हजार 275 शेतकर्‍यांचा समावेश होईल.