हरताळे फाट्यानजीक ट्रक समोरा-समोर धडकल्याने एक ठार ; तीन गंभीर जखमी

0

मुक्ताईनगर- हरताळे फाट्यानजीक हॉटेल गीतांजलीजवळ भरधाव ट्रक समोरा-समोर आदळून झालेल्या अपघातात एका ट्रकवरील चालक जागीच ठार झाला तर दुसर्‍या ट्रकवरील चालकासह क्लीनर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. पहाटे आलेल्या साखरझोपेमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. मयतावर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले तर दोघा गंभीर जखमींना जळगाव येथे हलवण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

अपघातामुळे वाहतूक ठप्प
ट्रक क्रमांक (सी.जी.04 एम.सी.4329) मुक्ताईनगरकडून येत असतांना नागपुरकडे जाणार्‍या ट्रक (आर.जे.48 जी.ए.5585) वर आदळून झालेल्या अपघातात एका ट्रकवरील चालक जयप्रकाश जियाराम यादव (22, जोनपूर, उत्तरप्रदेश) हा ठार झाला तर दुसर्‍या ट्रकवरील चालक व क्लिनर हनुमान समरवारूजी खारून तसेच सुरेश रामानंदजी खारून हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींना हरताळा येथील प्रदीप काळे, योगेश पाटील, सुनील तायडे, हरी जोशी, शुभम ठाकुर, शेख झाकिर, सय्यद शाहरुख आदींनी उपचारार्थ हलवण्याकामी मदत केली. पहाटे झालेल्या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली. पोलिस उपनिरीक्षक अशोक उजागरे, पोलिस नाईक श्रावण जावरे, राहुल नावकर, प्रमोद तायडे आदींनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, एका वाहनात पाईप तर दुसर्‍या वाहनात अन्य साहित्य वाहून नेले जात होते. पहाटे आलेल्या साखरझोपेमुळे हे ट्रक समोरा-समोर आदळून अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.