मुक्ताईनगर। तालुक्यातील हरताळे येथे बहुप्रतीक्षेनंतर परिसरातील शेतकर्यांची व ग्रामस्थांची वीज समस्या लक्षात घेता येथील 33 केव्ही उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून आता केवळ औपचारिक उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. हरताळेसह परिसरातील वीज समस्या गंभीर झाल्यानंतर वीज उपकेंद्राची मागणी करण्यात येत होती. त्यातच जागेचाही अभाव होता. जागा शोधण्यासाठीच दोन अडीच वर्षे निघून गेली. गेल्या 2011 पासून वीज उपकेंद्राची मागणी होती.
माजी महसुलमंत्र्यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन
माजी सरपंच दिपाली मुलांडे यांच्या कार्यकाळात प्रस्ताव होता. मात्र सत्तांतर झाल्यामुळे भाजपाचे सरपंच समाधान कार्ले यांच्या कार्यकाळात प्रत्यक्षाला कामाला मंजुरी मिळून सुरुवात झाली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंत्र्यांच्या उपस्थितीत 2 सप्टेंबर 2015 रोजी भूमीपूजन करुन मुहूर्तमेढ रोवली होती. या परिसरातील ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती शिवारही मोठे आहे, मात्र भारनियमनामुळे शेती उत्पादनावर परिणाम होत होता.
वीज पुरवठ्याचा लाभ होणार
आता सुमारे 256 कि.मी. अंतरावर पसरलेल्या शेती परिसराला उपकेंद्रामुळे लाभ मिळणार आहे. हरताळे शिवारातील माळेगाव रोडवरील गट नंबर 711/1/1 मध्ये डीपी बसविणे, खांब उभारणी, लाईट फिटींग, तार ओढण्याचे काम झाले आहे.
पिकांना होणार फायदा
तालुक्यातील कोथळी येथील 132 सबस्टेशनवरुन येथे कनेक्शन जोडण्यात आले आहे. सालबर्डी वगळता स्वतंत्र गाव परिसराला याचा लाभ मिळणार आहे. या परिसरात वीज पुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत होता. त्यामुळे शेती परिसरातील विज खंडीत झाल्यास पीकांना पाणी देणे कठीण व्हायचे याचा परिणाम पिकांवर होऊन शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचे, मात्र आता शेतकर्यांना पुर्ण वेळ वीज मिळणार असल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. सबस्टेशनवरील सप्लायही सुरु झाला असून जंगलातीील वीज पुरवठा करणे बाकी आहे. वीज प्रवाह दोन तीन दिवसातच सुरु होंणार असल्याचे येथील स्थानिक वायरमन संदीप तायडे यांनी सांगितले.