पंजाब । भारताचा जादुई गोलंदाज हरभजन सिंहचा काल वाढदिवस साजरा झाला. शुभेच्छांचा वर्षाव त्याच्या चाहत्यांनी न केला तर आश्चर्य. जगभरातील फिरकी गोलंदाजांमध्ये हरभजनचा समावेश होतो. भज्जी स्वभावाने उमदा म्हणून ओळखला जातो.
…तर हरभजन फलंदाज झाला असता
हरभजन सिंहचा जन्म 3 जुलै 1980 रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला. लहानपणी त्याला सोनू असेही म्हणायचे. सुरुवातीला हरभजन फलंदाजीचे प्रशिक्षण घेत होता. त्याचे प्रशिक्षक चरण सिंह भुल्लर यांचे काही वर्षांनतर निधन झाले आणि हरभजनचे लक्ष खेळातून उडाले.
कुंबळेमुळे बचावला भज्जी
त्यानंतर हरभजन नवे कोच देवेंद्र अरोर यांच्याकडे गेला. हे प्रशिक्षक त्याच्या गोलंदाजीने प्रभावित झाले. अशा तर्हेने पुढे हरभजनच्या रूपाने भारताला एक उत्तम गोलंदाज मिळाला. असे म्हणतात की, हरभजनच्या जीवनात एक कठीण काळही अवतरला होता. क्रिकेट सोडण्याचा निर्णय या नैराश्य काळात हरभजनने घेतला होता. 1999 ते 2000 दरम्यान हरभजनची खेळी बिघडली आणि टीममधून त्याला डच्चू मिळाला. काय करायचे हे सुचत नसल्याने कॅनडाला जाऊन ट्रक ड्रायव्हर बनण्याचा निश्चय त्याने केला. पण 2001 मध्ये अनिल कुंबळे जखमी झाला आणि हरभजनला ऑस्ट्रेलियाविरोधात खेळण्याची संधी मिळाली. या मालिकेनेच हरभजनाला यशाच्या शिखरावर नेऊन बसवले. मालिकेत त्याने 32 विकेट घेण्याचा महापराक्रम केला होता.