हरभरा पेरणीचे प्रात्यक्षिक

0

शिक्रापूर । हरबरा पिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ व्हावी म्हणून शिरुर तालुक्यातील टाकळी भिमा आणि श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील 10 हेक्टर क्षेत्रावर हरबर्‍याच्या पेरणीचे प्रात्यक्षिक राबविण्यात आले. सदर क्षेत्रावर बी. बी. एफ रुंद सरी वरंभा अवजाराने पेरणी बीजप्रक्रिया करून घेण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग शिरूर यांच्या माध्यमातून या दोन्ही गावातील शेतकर्‍यांसाठी बी. बी. एफ द्वारे पेरणी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे पिकांची उगवण व रोपातील अंतर आणि सलगता पाहून येथील शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे. टाकळी भिमा येथील शिवाजी सुदाम वडघुले व गंगाधर गाढवे यांच्या जमिनीवर हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी गट व पांडुरंग शेतकरी गटाचे सर्व सभासद उपस्थित होते. प्रगतशील शेतकरी राजेंद्र वडघुले हे उपस्थित होते. बी. बी. एफद्वारे पेरणी केल्यास योग्य अंतरावर बी पडते. सरी वरंबे तयार होऊन बियाण्यांबरोबरच खत सोडण्याची सोय या मशीनमध्ये आहे. या मशीनमुळे बियाणे कमी प्रमाणात लागतात आणि बियाणे वाया जात नाही. त्यामुळे उत्पन्नात वाढ होते, अशी माहिती कृषी अधिकारी प्रफुल्ल कामठे यांनी दिली. तर या प्रात्यक्षिक केलेल्या स्थळाची पाहणी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी व्ही. टी. बांगर, तालुका कृषी अधिकारी संजय पिंगट व शास्रज्ञ डॉ. भरत रासकर नुकतेच आले होते. याठिकाणी रोपांतील व ओळीतील अंतर, उगवण क्षमता, कीड व रोगांची माहिती व त्याचे नियंत्रण याविषयी माहिती त्यांनी शेतकर्‍यांना दिली. पिक उत्पादन वाढीसाठी अंतर मशागत व फवारणी मात्रा याची सखोल माहिती शेतकर्‍यांना दिली. यापद्धतीने निश्‍चितच उत्पादन वाढणार आहे, असा विश्‍वास शेतकर्‍यांनी व्यक्त केला.