तळेगाव दाभाडे : लोकलमधून आई-वडीलांसोबत जात असलेल्या दोन बालकांची लोकलमधील गर्दीमुळे ताटातूट झाली. लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलविली. त्यातून ही मुले लोणावळा रेल्वे स्टेशनवर रडताना आढळली. पालकांकडे नेताच ही बालके तत्काळ आईच्या कुशीत विसावली. त्यामुळे या पालकांच्या चेहर्यावर समाधानाचे हास्य पहायला मिळाले. सोमाटणे फाटा येथील दीपक राघवेंद्र उपाध्याय यांची पत्नी पूजा गर्भवती असल्याने त्यांना पिंपरीतील वाय.सी.एम हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी नेले होते. मात्र, त्याठिकाणी उपचार न झाल्याने या जोडप्याने पुन्हा तळेगाव जनरल हॉस्पीटल येथे येण्याचा निर्णय घेतला. पिंपरी रेल्वे स्टेशन येथून लोकल गाडीतून दुपारी सव्वा तीनच्या सुमारास तळेगाव दाभाडे येण्यासाठी लोकल पकडली. या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत त्यांची तीन लहान मुले होती. तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर उतरताना गर्दीच्या लोंढ्यात त्यांची अंश (वय 6) आणि कृष्णा (वय 4) या दोन बालकांची गर्दीत ताटातूट होऊन हरवली.
लोहमार्ग पोलिसांची तत्परता
दरम्यान, या आई-वडीलांनी तात्काळ तळेगाव दाभाडे रेल्वे पोलिसांकडे मदत मागितली. घडलेल्या प्रकार ऐकून महिला पोलीस प्रियांका नाईक यांनी धीर दिला. दोन्ही बालकांचे वय व वर्णन लिहून घेतले. त्यानंतर तपासाची सूत्रे हलली. सचिन पवार, संदिप काठे व अन्य पोलीस कर्मचार्यांनी तळेगाव दाभाडे ते लोणावळा रेल्वे स्टेशनवर या वर्णनाच्या बालकांचा शोध घेतला. या तपासादरम्यान ही दोन्ही बालके लोणावळा रेल्वे स्थानकावर घाबरलेल्या अवस्थेत रडत असताना आढळली. बालकांना ताब्यात घेऊन त्यांना आई-वडिलाच्या ताब्यात दिले. हरवलेले मुले आई-वडिलाच्या कुशीत विसावली. तळेगाव रेल्वे पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे ही दोन्ही बालके काही तासांतच आपल्या जन्मदात्यांच्या कुशीत आल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. लोहमार्ग पोलीसांचे आभार मानत उपाध्याय दांपत्याने घराची वाट धरली.