भुसावळात रमेश सरकाटेंची माहिती ; वितरण 8 सप्टेंबरला नांदुर्यात होणार
भुसावळ- भुसावळच्या मातोश्री शेवंताबाई सरकाटे स्मृति प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय शेवंताबाई सरकाटे स्मृदी काव्य पुरस्कार मंगळवार, 28 रोजी जाहीर करण्यात आले. प्रथम पुरस्कार साक्रीचे कवी रावसाहेब कुंवर यांच्या ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’ला तर द्वितीय पुरस्कार कवी प्रभाकर शेळकेंच्या ‘जाती अंताचे हुंकार’ व नागपूरचे कवी डॉ. चोरमारेंच्या ‘धर्मशास्त्राच्या अमानुष नोंदी’ या साहित्यकृतीला विभागून देण्यात येणार आहे. तृतीय पुरस्कार चांदूर रेल्वेच्या कवयित्री निर्मला सोनी यांच्या ‘तू गुंतला असा की’ व कवी सचिन कांबळेंच्या ‘भावनांचा कल्लोळ’ला विभागून देण्यात येईल. उत्तेजनार्थ पुरस्कार कवी यशवंत माळी यांच्या ‘सखी’, कवी जयराज खूने यांच्या ‘मी माझ्या भूमीच्या शोधात’ व कवी पंडित कांबळेंच्या ‘चरथ भिखखवे’ यांच्या काव्यसंग्रहांना विभागून देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सतीश साळी (जळगाव), नाना हिवराळे, दिलीप ब्राह्मणे (अकोला), रामदास वाघमारे (औरंगाबाद), अमोल खरे (मनमाड) यांना जाहीर झाला. पुरस्कार वितरण सोहळा 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे स्वर्गीय हरिभाऊ इंगळे स्मृति सभागृह, सप्टश्रृंगी टॉवर रेल्वेस्टेशनजवळ होईल. ‘बारोमासकार’ सदानंद देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. बुलडाणा येथील जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्धार्थ मेश्राम अध्यक्षस्थानी असतील.
काव्यसंग्रहांचे केले परीक्षण
राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी काव्यसंग्रह मागवण्यात आले होते. राज्यभरातून विविध जिल्ह्यातून साहित्यकृती आल्या. तज्ज्ञांच्या समितीने परीक्षण केले. त्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला. भुसावळसह संपूर्ण जिल्हा व परिसरात साहित्य चळवळ प्रवाहीत राहावी, या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात, अशी माहिती मातोश्री शेवंताबाई सरकाटे स्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा रेल्वे सुरक्षा बलाचे निवृत्त आयुक्त गझलकार रमेश निनाजी सरकाटे यांनी दिली.
कवयित्री मातेचे स्मरण
स्वर्गीय शेवंताबाई सरकाटे या कवयित्री होत्या. त्यांची जी मौखिक साहित्य संपदा आहे, ती त्या हयात असताना सुपूत्र रमेश सरकाटे यांनी लिहून ठेवली होती. हे दुर्मिळ साहित्य त्यांनी ‘जात्यावरची भीमगाणी’ नावाने प्रसिद्ध केले आहे. मातेने जोपासलेला हा साहित्याचा वसा पुढेही चालू राहावा, या उदात्ते हेतूने व निरपेक्ष भावनेने सरकाटे हे गेल्या दोन वर्षांपासून काव्यसंग्रह मागवून त्यांचे परीक्षण करून पुरस्कार देतात.