हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा संशयास्पद मृत्यू!

0

मुंबई : प्रख्यात अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षाचे होते. मात्र त्यांच्या मृत्यूवर पोलिसांनी संशय व्यक्त केला असून, त्यांच्या मृत्यूची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पोलिसांनी ओम पुरी यांच्या घराचा पंचनामा केला. प्राथमिकदृष्ट्या ओम पुरी यांच्या मृत्यू नैसर्गिक वाटत आहे. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, पुरी यांच्या डोक्याच्या मागे दुखापत झाली आहे. ही दुखापत पडल्यामुळे झाली असेल किंवा कोणीतरी मारल्यामुळे; याचा शोध घेतला जाणार आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणार आहोत. येणार्‍या-जाणार्‍यांचीही चौकशी होणार आहे. गरज पडल्यास पत्नी नंदिता पुरी यांचीही चौकशी केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या निधनाने सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे.

पत्नीशी झाले होते जोरदार भांडण
निर्माता खालिद रिझवी यांनी सांगितले. मी गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता ओम पुरी यांच्या घरी गेलो होतो. तिथे त्यांची मुलाखत सुरू होती. मुलाखत संपल्यानंतर ओम पुरींनी मला एका कार्यक्रमाला जायचे असल्याचे सांगितले. तसेच मला सोबत यायला सांगितले. पण मी नकार दिल्यावर पुरींनी गाडीने सोडण्यास सांगितले. त्यानंतर पहिल्यांदा ते त्रिशुल या त्यांच्या घरी गेले, जिथे नंदिता पुरी राहतात. यावेळी पत्नी नंदितासोबत त्यांचे जोरदार भांडण झाले. ते मुलगा इशांतला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते गाडीतच त्याची वाट पाहू लागले. यादरम्यान त्यांनी पुन्हा मद्यपानही केले. यानंतर आम्ही मनोज पहावाच्या घरी गेलो. तिथेही पैशांवरुन त्याचा कोणाशी तरी वाद सुरू होता. मी बाहेर होतो, त्यामुळे ते कोणाशी भांडत होते, हे मला माहीत नाही. ते बाहेर आले तेव्हा फारच भावुक झाले होते. त्यानंतर मी त्यांना सोडले. पण कारमध्ये त्यांचे पाकीट पडले होते. फारच उशीर झाल्याने त्यांचे पाकीट परत करण्यासाठी ड्रायव्हरला सकाळी त्यांच्याकडे पाठवले. पण ते दरवाजा उघडत नसल्याचे ड्रायव्हरने सांगितले.

विविधांगी भूमिका
1980 मध्ये आलेल्या ‘भवानी भवई’, 1981 मधील ‘सद्गती’, 1982 मध्ये ‘अर्धसत्य’, 1986 मध्ये ‘मिर्च मसाला’ आणि 1992 मध्ये आलेल्या ‘धारावी’ चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट काम केले होते. रंगभूमी असो किंवा समांतर सिनेमा, टीव्ही, बॉलिवूड, हॉलीवूडचा पडदा; भूमिका दहा मिनिटांची असो की नायकाची; ती अजरामर करण्याची ताकद ओम पुरी यांच्याकडे होती. त्यांनी सिनेसृष्टीत अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला होता. घाशीराम कोतवाल चित्रपटाद्वारे ओम पुरी यांनी अभिनयक्षेत्रात पर्दापण केले होते. ‘आक्रोश’ हा त्यांचा पहिला गाजलेला चित्रपट होता. केंद्र सरकारने त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले होते.