तेहरान : भारताची ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाने महिलांच्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून तिने जॉर्जियाच्या सोपिको गुरमिश्विलीचा टायब्रेकमध्ये 3.5-2.5 अशा गुणांनी पराभव केला. तिची सहकारी पद्मिनी राऊतला मात्र चीनच्या तान झोंगयी हिच्याकडून २.५-३.५ असा पराभव स्वीकारावा लागला. हरिका व गुरामिश्वेली यांच्यातील पहिले दोन डाव बरोबरीत सुटल्यानंतर टायब्रेकरचा उपयोग करण्यात आला.
आक्रमणाची फारशी संधी नाही
सर्वसाधारण वेळेतील डावांमध्ये हरिकाला विजयाची संधी साधता आली नाही. त्यामुळे पुन्हा या दोन खेळाडूंमध्ये बरोबरी झाली. २-२ अशा बरोबरीनंतर झालेल्या दहा मिनिटांच्या दोन डावांपैकी पहिल्याच डावात हरिकाने शानदार कामगिरी केली. तिने कल्पक चाली करीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला आक्रमणाची फारशी संधी दिली नाही. हा डाव जिंकून तिने आपली बाजू भक्कम केली. पाठोपाठ झालेला दुसरा डाव बरोबरीत सोडवून तिने उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली.
रॅपिड डावांत पूर्ण वर्चस्व
पद्मिनीने टायब्रेकरमधील पहिला डाव जिंकला होता. दुसरा डाव बरोबरीत सोडवून उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या ती उंबरठय़ावर होती. मात्र या डावात तिची प्रतिस्पर्धी झोंगयीच्या आक्रमक खेळापुढे आपला बचाव टिकवता आला नाही. हा डाव जिंकून झोंगयीने टायब्रेकरमध्ये पुन्हा बरोबरी साधली. हरिकाने रॅपिड डावांत पूर्ण वर्चस्व गाजविले. तिला टायब्रेकच्या पहिल्या संचातच विजय मिळाला असता. पण रॅपिडमधील दुसऱ्या डावात तिने विजयाची संधी दवडली. मात्र त्यानंतर झालेल्या दहा मिनिटांच्या अति जलद डावात तिने शानदार प्रदर्शन करीत विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरीतील स्थानही निश्चित केले. पद्मिनी राऊत मात्र पूर्ण एका गुणाच्या आघाडीचा लाभ घेता न आल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले.
पद्मिनीने केले निराश
पद्मिनीने या स्पर्धेत २५ वी मानांकित खेळाडू एलिना डॅनियलीन व अनुभवी खेळाडू झाओ झुई यांना पराभवाचा धक्का दिला होता. हे सामने जिंकताना तिने केलेला प्रभावी खेळ तिला झोंगयीविरुद्ध दहा मिनिटांच्या डावात करता आला नाही. मात्र या डावाला पद्मिनीला प्रभावी खेळी करता आली नाही. झोंगयीने या दोन डावांपैकी एक डाव जिंकला व एक डाव बरोबरीत ठेवीत पद्मिनीची नेत्रदीपक वाटचाल रोखली. हरिकाला उपांत्यपूर्व फेरीत जॉर्जियाची खेळाडू नॅना ड्झिग्निडझशी खेळावे लागणार आहे.