मुंबई : चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात ४ कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे. वाढणारा उष्मा, पाणी टंचाई, दुष्काळ, पर्यावरणातील असमतोल, समुद्रपातळीत होणारी वाढ यांसारख्या नैसर्गिक आपदांवर मात करण्यासाठी हे अभियान महत्वाचे ठरणार आहे. या अभियानाची सुरवात या उद्दिष्टपूर्तीसाठीच करण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले कि , राज्यात गेल्या वर्षी दोन कोटी झाडे लावण्यात आली होती त्यापैकी ७५% झाडे जगली आहे . या झाडांवर वनविभाग लक्ष ठेऊन आहे. या उपक्रमाला पुढे वाढवत राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले असून राज्यात रोप तुमच्या दारी हि योजना राबवण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये १९२६ या क्रमांकावर फोन केल्यावर तुमच्या घरी तुम्हाला हवे असलेले रोप मिळणार आहे. तसेच वनविभागाच्या सर्व माहिती या फोन नंबर वर मिळणार आहे. राज्यात हरित सेना उभारण्यात येत असून यासाठी तालुकानिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली.
हरित सेनेच्या माध्यमातून या आठवड्यात एक कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या सेनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन वन मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केले आहे . राज्यात हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्य वन विभागाच्या माध्यमातून येत्या तीन वर्षात ५० कोटी झाडे लावण्याचे लक्ष वनविभागाने ठेवले आहे . या उपक्रम अंतर्गत १ जुलै २०१७ ते ७जुलै पर्यंत ४ कोटी झाडे लावली जाणार आहेत. या कार्यक्रमाची सुरवात ऐरोली मधून होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ३३% हे वनक्षेत्र असणे आवश्यक असून त्यामुळे राज्यात ४०० कोटी झाडांची लागवड करावी लागणार आहे . या झाडांच्या लागवडीसाठी ४० हजार स्क्वेअर मीटर जमिनीची गरज आहे मात्र इतकी जमीन वनविभागाकडे उपलद्ध नाही. त्यामुळे वनविभागेत्तर जमिनीचा वापर करून हे उद्दिष्ट्य पूर्ण करणार असून यासाठी लोकसहभागाची गरज आहे. राज्यातील जनतेने वृक्षारोपण करावे आणि लावलेल्या झाडाची नोंद माय प्लान्ट या अँप वर करावी तसेच या रोपाचे संरक्षण-संवर्धन करावे, असेही यावेळी ते म्हणाले.