हरित सेनेमध्ये सहभागी होऊन वन संपत्ती वाढवू या!

0

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या शब्दांत संतांनी वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केलेले आहे. निसर्गाचा योग्य समतोल हा माणसाच्या आणि वातावरणाच्या स्वस्थ संपन्न अस्तित्वासाठीचा महत्त्वपूर्ण घटक आहे. वन, वन्यजीव, जैवविविधता, सामाजिक वनीकरण, पर्यावरण व निसर्ग संरक्षण व संवर्धन या सर्व गोष्टी लोक सहभागाशिवाय शक्य होणार नाही. शासनाने सन 2017,2018 व 2019 या तीन वर्षांत पन्नास कोटी वृक्षारोपण व संगोपनाचा संकल्प केलेला आहे. हा कार्यक्रम लोक सहभागाद्वारे जन चळवळीत रूपांतरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जन-सहभाग मिळणे आवश्यक आहे. या दृष्टीने वृक्ष लागवड करण्यासाठी लोकांनी स्वयंस्फूर्तीने प्रचंड संख्येने पुढे येण्याच्या व्यापक उद्देशाने वन विभागाच्या वतीने राज्यात हरित सेनेची निर्मिती करण्यात आलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या उपक्रमांतर्गत एकूण 20,144 इतकी नोंदणी करण्यात आलेली आहे. यामध्ये वैयक्तिक नोंदणी 14 हजार 425 संस्थांनी 745 नोंदणी केली असून, त्यांच्या सदस्यांद्वारे 5 हजार 719 नोंदणी हरित सेनेमध्ये करण्यात आली आहे.

प्रामुख्याने वन व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनात प्रत्येक नागरिकाचा सहभाग असावा या दृष्टीने एक सामाजिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच वन, वन्यजीव संवर्धन व संरक्षणात लोकसहभाग प्रभाविपणे वाढवणे हे हरित सेनेच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यावर निसर्गप्रेमी, वृक्षसंगोपनाची आवड असलेल्या व्यक्तींनी सदस्य नोंदणी करावयाची आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहनचालकाचा परवाना, मतदार ओळखपत्र, शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र, पासपोर्ट, संस्थेचा नोंदणी क्रमांक यापैकी कोणत्याही एका कागदपत्राची नोंदणीसाठी आवश्यकता आहे.

हरित सेना सदस्यत्वासाठी वैयक्तिकरीत्या तसेच सामूहिकरीत्या दोन्ही पद्धतीने सदस्य होता येणार आहे. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शासकीय कर्मचारी (कार्यरत तसेच निवृत्त) खाजगी संस्थाचे कर्मचारी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक हे सर्व वैयक्तिकरीत्या सदस्य होऊ शकतात. तर निमशासकीय व अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, औद्योगिक तसेच स्वंयसेवी संस्था सामूहिकरीत्या सदस्यत्व घेऊ शकतात. हरित सेनेमुळे जनतेचा व्यापक लाभ होणार असून, यात वर्षभर सक्रिय असलेल्या स्वयंसेवकाच्या कार्याची शासनाकडून प्रमाणपत्र, पारितोषिक देऊन दखल घेण्यात येणार असून, चांगले काम करणार्‍यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. वन दिन, वन्यजीव सप्ताह यांसारख्या सोहळ्यात स्वयंसेवकांनी सक्रियपणे सहभाग घेणे तसेच सायकल रॅली, रोड शो, पथनाट्य, प्रभातफेरी यांसारख्या जनजागृती कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. त्याचसोबत हरित सेना स्वयंसेवक त्यांच्या कार्यक्षेत्रात वन वन्यजीव विभाग पर्यावरणाशी संबंधित उपक्रम उत्स्फूर्तपणे घेऊ शकतात. या निसर्गाची, आपल्या पर्यावरणाची योग्य ती काळजी घेणे हे आपल्या सगळ्यांचे नैतिक कर्तव्य आहे. भारताच्या संविधानामधील कलम 51 ए (जी) नुसार वने, जलाशये, नद्या आणि वन्यजीव यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. निसर्ग आपले म्हणून पर्यावरण जीवन सुंदर समृद्ध करण्यासाठी या विधायक उपक्रमात नोंदणी करून सक्रियपणे सहभाग घेऊ या, आपला परिसर सुजलाम सुफलाम करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकू या.

– विशाल मोरेकर
जनशक्ति प्रतिनिधी, मुंबई
9869448117