हरिविठ्ठलनगरचा मुख्य रस्ता घेणार मोकळा श्वास !

0

उपमहापौर सुनील खडके यांच्या सूचना: प्रभाग 11 च्या नागरिकांच्या तक्रारींची घेतली दखल

जळगाव: हरिविठ्ठल नगरातील मुख्य वर्दळीचा असलेल्या रस्त्यावर श्री साई मंदिरापासून खंडेराव नगरपर्यंत काही नागरिकांनी पक्के अतिक्रमण केले असल्याने रस्ता अरुंद झाला असल्याची तक्रार उपमहापौर सुनील खडके यांच्याकडे मांडण्यात आली. उपमहापौरांनी तक्रारीची दखल घेत रस्त्याची मोजणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी नगररचना अधिकार्‍यांना दिल्या.

’उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग 11 मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक ललित कोल्हे, संतोष पाटील, पार्वताबाई भिल, माजी स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, मनोज आहुजा, चेतन सनकत, भारत कोळी, मनोज काळे, दीपक पाटील, कुंदन काळे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

संरक्षक भिंत उभारणार
हरीविठ्ठल नगरातील नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत नसल्याने पावसाळ्यात नाल्याचे पाणी इतरत्र वाहू लागते, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. नाल्याला संरक्षक भिंत बांधल्यास ही समस्या सुटणार असल्याचे नगरसेवकांनी लक्षात आणून दिले. उपमहापौरांनी याबाबत बांधकाम विभागाला योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तसेच हरी विठ्ठल नगरच्या मुख्य रस्तालगत दोन्ही बाजुला गटारी कराव्या असेही उपमहापौर सुनील खडके यांनी सांगितले.