जळगाव। थट्टा-मस्करीतून वाद उफळून एकाने तरूणावर हेक्सा ब्लेडने पोटावर व हातावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना 2 नोव्हेंबर 2014 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरात हनुमान मंदिराजवळ घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात त्या ब्लेडने वार करणार्या प्रौढाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शनिवारी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांनी 1 वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली असून 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
थट्टा, मस्करीतून घडला प्रकार
रिक्षाचालक रविंद्र शांताराम पाटील यांच्या रिक्षातून 2 नोव्हेंबर 2014 रोजी गोकुळ रामदास पाटील (वय-50) व दिनेश काशिनाथ भोई (वय-25, दोन्ही रा. हरिविठ्ठलनगर) हे दोघे जात होते. रिक्षा हरिविठ्ठलनगरातील हनुमान मंदिराजवळ पोहोचल्यानंतर गोकुळ आणि दिनेश यांच्यामध्ये थट्टा-मस्करीतून वाद होवून बाचाबाची झाली. यानंतर रिक्षाचालक रविंद्र पाटील गोकुळ पाटील याला त्याच्या घरी सोडून निघून गेला. परंतू, गोकुळ याने घरात जावून घरात पडलेले हेक्सा ब्लेड घेवून हनुमान मंदिराकडे आला. दिनेश हा रिक्षाजवळ उभा असतांना त्यांच्या पोटावर व हाताच्या बोटावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले. यात दिनेश गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी दिनेश यांचे घेतलेल्या जबाबावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गोकुळ रामदास पाटील यांच्याविरूध्द कलम 324, 504, 510 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लागलीच आरोपी गोकुळ याला त्याचदिवशी रात्री अटक केली होती. याप्रकरणाचा खटला न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात सुरू होता. त्यात सरकारपक्षातर्फे अॅड. आशा शर्मा यांनी 7 साक्षीदार तपासले. या खटल्यात दिनेश भोई, यशवंत भोई, रमेश भोई, ज्ञानेश्वर पाटील, रविंद्र शांताराम पाटील, डॉ. सचिन पाटील, सपोनि.दिपली पाटील यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या.
अशी सुनावली शिक्षा
तरूणावर ब्लेडने वार केल्याप्रकरणी गोकुळ रामदास पाटील याला न्यायाधीश प्रतिभा पाटील यांनी शनिवारी दोषी धरत शिक्षा सुनावली. त्यात कलम 324 अन्वये 1 वर्षाची कारावासाची शिक्षा तसेच 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद सुनावली आहे. यातच दंडातील रक्कमेपैकी 4 हजार रुपये फिर्यादी दिनेश भोई यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले तर आरोपीपक्षातर्फे अॅड. बारी यांनी कामकाज पाहिले.