हरिविठ्ठल नगरात लाकडी घराला आग

0

जळगाव । शहरातील हरिविठ्ठल नगरात गुरुवारी सकाळी 11 वाजता पार्टेशनच्या घराला शॉट सर्कीटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली असून त्यात कपडे, धान्य, प्लास्टीक तसेच फायबरचे भांडे व रोख रक्कम जळून खाक झाली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे आग विझविण्यात आली आहे. याबाबत पोलिसात आगीची नोंद करण्यात आली आहे. हरिविठ्ठल नगरातील रहिवासी मिश्रीलाल सल्ला राठोड हे गवंडी काम करतात.

गेल्या पाच महिन्यापासून संजय पंढरीनाथ सपके यांच्या घरात मिश्रीलाल राठोड हे भाड्याने पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता मिश्रीलाल व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून कामावर निघून गेले तर मुले शाळेत गेली. त्यानंतर घरात शॉर्ट सर्कीट झाल्याने आग लागली. लाकडी पाट्यांच्या या घराला पत्रे असल्याने मोकळ्या फटीतून धूर बाहेर येत होता. शेजारी राहणार्‍या लोकांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर घराला लावलेल्या लाकडी पाट्यांनी फेट घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घर मालक संजय सपके यांनी मनपा अग्निशमन दलाला फोन करुन बंब मागविला, तोर्पयत नागरिकांनी घरातील पाणी आणून आग विझविण्याचा प्रय केला. बंब आल्यानंतर आग विझविण्यात आली. दरम्यान, मिश्रीलाल व त्याची पत्नीही तत्काळ घरी आले. आगीत संपूर्ण संसार जळून खाक झाल्याने राठोड दाम्पत्याने आक्रोष केला. आगीत कपडे, धान्य, प्लास्टीक तसेच फायबरचे भांडे व साडेचारशे रूपयांची रोख रक्कम जळून खाक झाली आहे. तर याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.