हॉट एक्सलमुळे भुसावळात बदलली एसी बोगी ; पावणेतीन तास प्रवाशांचा खोळंबा
भुसावळ- डाऊन 12171 एलटीटी-हरीद्वार एक्स्प्रेसचा भुसावळातील सीएनडब्ल्यू विभागाच्या सतर्क कर्मचार्यामुळे अपघात टळल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता भुसावळ स्थानकावर घडली. डाऊन एलटीटी-हरीद्वार एक्स्प्रेसचे सोमवारी दुपारी अडीच वाजता रेल्वे स्थानकात आगमन होत असतानाच एसी टू टायर बोगी क्रमांक 14059 चा एक्सल हॉट झाल्याची बाब टेक्नीशीयन राजेंद्र कनव्हाल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वरीष्ठांना माहिती कळवली. भुसावळात वातानकूलित कोच उपलब्ध नसल्याने स्लीपर कोच लावून सायंकाळी 5.10 वाजेच्या सुमारास एक्स्प्रेस पुढील प्रवासास रवाना करण्यात आली तर तब्बल दोन तास 40 मिनिटे गाडी भुसावळात खोळंबल्याने प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला.
कर्मचार्याची सतर्कता पुन्हा उघड
संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या एक्स्प्रेसला मुंबई, कल्याण, नाशिक नंतर थेट भुसावळला व पुढे भोपाळलाच थांबा आहे तर भुसावळ रेल्वे स्थानकात गाडी प्रवेश करीत असताना सीएनडबल्यू कर्मचार्याला वातानुकूलित डब्यात हॉट एक्सल झाल्याची बाब लक्षात येताच त्यांनी वरीष्ठांना माहिती दिली. वेळीच ही बाब लक्षात आली नसतीतर पुढे जावून डबा रेल्वे रूळाखाली घसरून अपघात होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिनी.डीएनई.(कोचिंग) रामचंद्रन, सहाय्यक यांत्रिक अभियंता शेख जावेद, स्टेशन संचालक जी.आर.अय्यर, एसीएम अजयकुमार, स्टेशन मॅनेजर मनोजकुमार श्रीवास्तव आदींनी धाव घेत माहिती जाणून घेतली तर भुसावळात एसी कोच नसल्याने गाडीचा नादुरुस्त एसी कोच काढून स्लीपर कोच लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजीही व्यक्त केली. सायंकाळी 5.10 वाजेच्या सुमारास गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.