हर्बल कंपनीच्या कार्यालयात चोरी करणार्‍या दोघांना अटक

0

मुंबई । पवई येथील एका हर्बल कंपनीच्या कार्यालयात घुसून, मँनेजरला बांधून ठेवून त्याच्याकडून 9.50 लाखाची जबरी चोरी करून फरार झालेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे. रेहमत मोहमद आली (21) आणि शिवकुमार प्रताप सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 6.35 लाखाची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. पवई येथील भवानी इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये असणार्‍या उदय इ कॉमर्स येथील मँनेजर सुमित राठोड (22) हे आठवडाभर त्यांच्याकडे जमा होणारी रक्कम रविवारी जमा करत असतात. रविवारी, 18 फेब्रुवारी रोजी सुद्धा ते त्यांच्याकडे जमा झालेली 9.50 लाख रुपयाची रक्कम बॅगेत भरून जमा करण्यासाठी निघाले होते. ते बाहेर निघत असतानाच तोंडावर बुरखा घातलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या कार्यालयात घुसून, त्यांच्या तोंडाला पट्ट्या मारून, बांधून ठेवून त्यांच्याकडील रोकड घेवून तेथून पोबारा केला होता.

सीसीटीव्हीच्या फुटेजमधून चोराचा सुगाव लागला
आम्ही आसपासच्या परिसरात असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. सोबतच मिळालेल्या टेक्निकल माहितीच्या आधारे आम्हाला चोरट्यांबाबत सुगावा लागला. आरोपी हे दिल्लीत असल्याची माहिती मिळताच आम्ही गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक महामुनी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक देसाई यांचे एक पथक तयार करून दिल्लीला पाठवून, तेथून आरोपींना अटक केली आहे, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले. पोलिसांनी अटक आरोपींकडून 6.35,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. भादंवि कलम 342, 392, 452, 504, 34 नुसार दोन्ही आरोपींना अटक करून स्थानिक कोर्टात हजर केले असता त्यांना अधिक चौकशीसाठी 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.