नवी दिल्ली : अनुभवी राजनैतिक अधिकारी हर्षवर्धन शृंगला यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाल दोन वर्षाचा असणार आहे. ते विद्यमान परराष्ट्र सचिव विजय गोखले यांची जागा घेतील. सध्या ते अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहात आहेत. भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) १९८४ च्या तुकडीचे अधिकारी असलेले शृंगला भारताच्या शेजारी देशांबाबतचे तज्ज्ञ मानले जातात.
अमेरिका, चीन यांच्या परराष्ट्र धोरणविषयक आव्हाने भारताला भेडसावत असताना शृंगला यांची नियुक्ती झाली आहे. भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्यावर अनेक देशांकडून टीका होत असताना, या संदर्भात जास्तीत जास्त देशांशी राजनैतिक मार्गाने संपर्क साधणे, हे शृंगला यांच्यापुढील तातडीचे काम राहील अशी अपेक्षा आहे.